Sunday, September 9, 2012

मृत्युंजय....




 


 

मृत्युंजय....


        पुस्तक वाचन हा माझा छंद नाही.. पण कधी कधी एखादं अनोळखी, अपरिचित व्यक्तिमत्व जसं आपल्याला एखाद्या अनामिक बंधानं खेचतं तसं काहीसं माझं आणि पुस्तकांचं नातं आहे असं मला वाटत राहातं. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातुन गावीच झालं. त्यावेळी लहान असताना आम्ही वेंगुर्ल्याच्या एस्.टी. स्टँडवर असलेल्या पुस्तकाच्या दुकानातून दोन-दोन रुपड्यांची गोष्टींची पुस्तकं वाचत असू. एकदा मामा वेंगुर्ल्याच्या नगर वाचनालयातून "ययाति" घेऊन आला. ते जाडजूड पुस्तक, कसल्याशा कादंबरी प्रकारातलं होतं. मामा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते वाचायचा.पण मी कधी त्या पुस्तकाच्या वाटेला जाणार नव्हतो. किंबहुना ते पुस्तक मोठ्यांसाठी असेल अशी माझी धारणा होतीकारण आम्ही लहान मुलं एवढी जाडजुड पुस्तकं कधी वाचत नसू. पण जेव्हा - जेव्हा ते पुस्तक मला घरात दिसे तेव्हा तेव्हा त्या पुस्तकावरला तो शुभ्र घोडा मला त्याच्याकडे खेचायचा प्रयत्न करी. "ययाति" ही तीन अक्षरं मला कोणत्या तरी अनामिक बंधाने स्वःताकडे बोलावित्.शेवटी एकदाचं ते पुस्तक मी हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. आणि असा काही त्या पुस्तकात गुंतलो की मला दुसरं तिसरं काहीच सुचेनात्यावेळी मी सहावी-सातवीत असेन, पण त्या पुस्तकाने माझ्यावर अशी काही मोहीनी घातली की मी.. असो 
"जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही." हे वाक्य त्यादिवसापासून मी कधीच विसरलो नाही आणि कदापि विसरू  ही शकणार नाही..

आणि त्यादिवसापासून वि.स्.खांडेकरांचा मी भक्त झालोमग मामाकरवी मी त्यांची बाकीची पुस्तकं ही वाचून काढली..पण मिळेल ते कोणतेही पुस्तकं मी वाचतं नव्हतो आणि आज ही नाही वाचत याचं सर्वात मोठं कारण माझी आळशी वृत्ती हेच आहे... अशा वृत्तीमुळेच मी अनेक चांगल्या पुस्तकांना मुकलोय.. पण काही पुस्तकं आज ही मला खुणावत राहतात.. विश्वास पाटलांचं "पानिपत" ही मला असंच स्वःताकडे ओढतं होतं..ते वाचून झालं पण पानिपताचा तपशिलवार इतिहास जाणून घेण्यासाठी मग शेजवलकरांचं "पानिपत १७६१" वाचून काढलं तेव्हा कुठे समाधान झालंकाही लोकांच्या केवळ दुराग्रहांमुळे, इतिहासानं ही ज्यांची उपेक्षा केली असे "छत्रपति संभाजी महाराज" यांचं व्यक्तिमत्व ही मला असंच खुणावू लागलं आणि मी त्यांना ही शरण गेलो. अखिल मानवजातिला शांतिचा संदेश देणार्या भगवान गौतम बुद्धांचं जीवन चरित्र आणि व्यक्तिमत्व मला अगदी लहानपणापासूनच त्यांच्याजवळ खेचत होतंभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक "बुद्ध आणि त्याचा धम्म" या बुद्ध धम्माचा धर्मग्रंथाने तर आयुष्यातल्या किती तरी प्रश्नांची उत्तरं मिळाली..

पण या सर्वात, महान कर्ण कुठे तरी मला साद घालत होता. दहावित असताना अचानक "मृत्युंजय" माझ्य हाती लागलं पण अभ्यासाच्या नावापुढे ते मला वाचता नाही आलं आणि तेव्हापासुन माझी आळशी वृत्तीमुळे असेल मला हे पुस्तक वाचण्याचा योग आला नाही. मागल्या महिन्यात आम्ही काही मित्र नाटकासाठी म्हणुन दादरच्या शिवाजी मंदीरला गेलो होतो. सचिनस्नेहल, श्री ताई, अनघा, रोहन - शमिका आणि आमचे तरुण फलटणकर काका असे जमलो होतो. नाटक सुरु व्ह्यायला अजुन वेळ होता म्हणून अनघा आम्हाला शिवाजी मंदिराच्या तळमजल्यावर असलेल्या मॅजेस्टीक ग्रंथ दालनात घेउन गेली आणि मागच्याच महिन्यातल्या माझ्या वाढदिवसाप्रित्यर्थ म्हणून तिने मला पुस्तकं द्यायची ठरवलं. ती आणि बाकीचे सगळेजण मला द्यायला म्हणून एक -एक पुस्तकं चाळू लागले, पण मुळातच मला वाचनाचा कंठाळा म्हणून मी टाळू लागलो. पण अनघा मला अशी सोडणार नव्हती. ती मला एक-एक पुस्तक दाखवत होती, "हे बघ! हे तुला नक्की आवडेल. हे दुसरं बघ ! हे पण खूप छान आहे." असं करत होती पण मला एक ही आवडत नव्हतं आणि क्षणात माझी नजर तिथे ठेवलेल्या "मृत्युंजय" वर पडली. गेली कित्येक वर्षे मला खुणावणारं हे पुस्तक आज मी घ्यायचं ठरवलं. त्या पुस्तकाच्या मुखपृष्टावरील तो धनुर्धर, वीर कर्ण जणू मला खुणावत होता. मी ते पुस्तक उचललं आणि तिला बोललो की, मला भेट म्हणून हे पुस्तक दे.. "हे तू अजुन वाचलं नाहीस?" तिच्याबरोबरच्या बाकीच्यांचा नजरा ही मला हाच प्रश्न विचारत होत्या.. पण मी तेच घ्यायचं ठरवलं. मग तिने तिच्या आवडीचं अजुन दुसरं "गंगा आये कहाँ से" हे ही पुस्तक घेतलं आणि ही दोन पुस्तकं मला माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रांनी भेट दिली..

आठवड्यापूर्वी पुस्तक वाचायला घेतलं आणि आज संपवलं ही.. आज पुस्तक संपवताना शेवटच्या क्षणी अक्षरशः डोळ्यातून अश्रु पाझरले. घसा सुकला होता. ट्रेनमध्ये बसून डबडबलेल्या डोळ्यांनी मी एका महान वीराचा अंत वाचत होतो आणि तो ही भगवान श्रीकॄष्णाच्या मुखातून. जन्माच्या क्षणापासून नाळही कापता जी उपेक्षा या महान वीराच्या नशिबात आली ती त्याच्या शेवटच्या काळापर्यंत तशीच
राहीली.

कर्ण!
सूतपुत्रकर्ण!
सुर्यभक्तकर्ण!
वीरधनुर्धरकर्ण!
अंगराजकर्ण!
दानवीरकर्ण !

पुस्तकाच्या पहिल्या शब्दापासुन ते शेवटच्या शब्दापर्यंत कर्णाने माझं आयुष क्षणात व्यापुन टाकलं. फक्त कर्णच नव्हे तर त्या पुस्तकात असलेल्या इतर अनेक व्यक्तिरेखांनी मला असंच भाळून टाकलं. पण शेवटी मनात राहिला तो कर्णच. यापूर्वी मी कर्णावर आधारीत कोणतं ही पुस्तक वाचलं नव्हतं कारण मृत्युंजय म्हणजेच कर्ण असं मी  माझ्या बर्याच वाचक मित्रांकडुन ऐकत आलो होतोमहाभारतात आणि अनेक चर्चांमध्ये मी कर्णाबद्दल ऐकलं होतं. पण का माहित का जसं मी सुरुवातिलाच म्हणालो की काही व्यक्तिमत्वं आपल्याला एका अनोळखी बंधातून आपल्याकडे आकर्षित करत राहतात त्यापैकी भगवान गौतम बुद्ध; छत्रपति शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण यांच्यानंतर कर्णाचं स्थान माझ्या आयुष्यात अढळ आहे.

खरं तर महाभारतातली ही अनेक पात्रं म्हणजे मनुष्याच्या प्रवृत्तीचं एक दर्शन आहे. जणु महर्षी व्यासांनी अखिल मानवजातीचं भवितव्यच महाभारतातून लिहून ठेवलं होतं.. प्रत्येक पात्राची एक विशिष्ट वृत्ती, एक विशिष गुण; पण कर्ण हा प्रत्येक संभ्रमित, शापित व्यक्तिचा मुळ पुरुष असावा..

पुस्तक वाचताना नकळत आपण कर्णाच्या त्या प्रवासात सामिल होतो. या प्रवासाचा अन्त काय होणार ते आपल्याला ठाउक असतं पण महत्त्वाची गोष्ट महणजे या प्रवासात त्या महान वीरासोबत आपण सुद्धा आपला शोध घ्यायला लागतो. त्याच्या प्रत्येक कृतितून, त्याच्या आदर्शातून, त्याच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीत आपण आपल्याला कुठेतरी शोधत राहतो...

आपल्या माता-पित्यांची सेवा करणारा कर्ण!
त्याच्या धाकटया भावाचा (शोण) आदर्श असलेला कर्ण!
आपल्या जन्मजात कुंडलं आणि अभेद्य शरीर कवचाबद्दल नेहमी संभ्रमात असलेला कर्ण!
एका अनामिक ओढीनं सुर्याची नित्यनेमानं आराधना करणारा कर्ण!
हस्तिनापूरात गुरु द्रोणानी गुरुत्व नाकारताच त्याक्षणी सुर्याला अखेरपर्यंत गुरु मानणारा कर्ण!
स्पर्धेत द्रोणांच्या अर्जुनप्रेमामुळं अजिंक्यत्वाचा मान हिरावलेला पण त्याहीपेक्षा पांडवांनी सूतपुत्र म्हणून केलेल्या निर्भत्सनेने मनाने जळून गेलेला कर्ण !
दुर्योधनाने त्याक्षणी त्याला अंगदेशाचा राजा म्हणून केलेला राज्याभिषेक आणि त्याच क्षणापासून दुर्योधनाची अखरेपर्यंत साथ देणारा कर्ण!
वृषालीसारख्या सुंदर सारथीकन्येच्या प्रेमात पडलेला आणि तिच्याशी विवाह करुन तिच्यावर निरंतर प्रेम करणारा कर्ण!
भर सभेत द्रौपदीने "सूतपुत्र" म्हणून ज्याची अवहेलना केली आणि ती अवहेलना गिळून गप्प बसणारा कर्ण!
संपूर्ण भारतवर्षात दिग्विजय संपादन करणारा पराक्रमी, वीर कर्ण!

अशी कर्णाची अनेक रुपं या प्रवासात आपल्या समोर येतिल आणि मग वाचता वाचता त्याच्यासारखीच झालेली आपल्या मनाची घालमेल.. कुठे संपणार ? ठाउक नसतं....
अनेक भावनिक संघर्षात गुरफटलेला तरीही आपल्या सामर्थ्यावर आणि शब्दावर बद्ध असलेला कर्ण आपल्याला जवळचा वाटू लागतो."प्रत्येंचेशिवाय धनुष्य नाही आणि भावनेशिवाय मनुष्य नाही" असं सांगणार्या कर्णाच्या त्या अभेद्य कवचामागे एक भावसंपन्न, प्रेमळ झरा नेहमी खळाळत असल्याची ग्वाही देत राहतो.कारण माझ्यासारखा प्रत्येक भावनिक आणि संवेदनशील माणूस त्याच्या जीवनात स्वःताचा शोध घेत राहतो. त्याच्या आयुष्यातलया प्रत्येक कटू प्रसंगात स्व:ताचं दु: शोधत राहतो. माणसाला त्याच्यासारखाच समदु:खी माणूस भेटला की आनंद होतोच,नाही का? त्याच्या आयुष्यातलया अनेक कोड्यांची उलगड करताना त्याच्या मनाची स्थिती आपल्या मनाचा कुठेतरी ठाव घेतेच..अखेरच्या श्वासापर्यंत सूतपुत्र म्हणून हीणवलेला गेलेला हा वीर अखेरपर्यंत आपल्या शब्दालाच जागला..

मृत्युंजयकार श्री.शिवाजी सावंतांनी कर्णाच्या आयुष्यावर ही महान कादंबरी लिहून एक प्रकारे त्याचे संभ्रमित आणि गुढ जीवन सुर्यतेजाने झळाळून सोडलेनाहीतर कदाचित आपल्यालाही त्याच्यासारखेच अनेक प्रश्न पडले असते आणि आपण ही त्यावर धड विचार करु शकलो नसतो.

सुर्यपुत्र असूनही त्याच्यावर अखेरच्या क्षणापर्यंत अन्याय झालाहा अन्याय कोणी केलाकुंतीने कौमार्यात जी चूक केली ती तिला महाभारताच्या शेवटच्या युद्धात उमगली. फक्त आपल्या पाच पुत्रांना अभय मिळावं म्हणून ती कर्णाकडे गेलीस्वार्थ हा मनुष्याला सर्व काही विसरायला लावतो. कर्णाला तो तिचाच पुत्र आहे याची जाणिव करुन देताना तिने त्याला हस्तिनापूरचे राज्यसुंदर द्रौपदी या सर्वांचं आमिष दाखवायचा प्रयत्न केला पण कर्ण बधला नाही. जेव्हा तिचे स्वःताला क्षत्रिय म्हणवून घेणारे पुत्र कर्णाचा सूतपुत्र म्हणून अपमान करत होते तेव्हाही कुंतीने कधी हस्तक्षेप केला नाही. याची कारणं, तिची त्यावेळची मनसिक स्थिती,भविष्य आणि वर्तमानाच्या चक्रात अडकलेल्या कुंतीच्या मनाचं यथार्थ वर्णन सावंतांनी केलं आहे. पण मी तरी या सर्वासाठी फक्त कुन्तिलाच जबाबदार धरेन. ज्या धैर्याने तिने राजा कुंतिभोजाचं राज्य सांभाळलं, ज्या धैर्याने ती हस्तिनापूरची महाराणी झाली, ज्या धैर्याने तिने आपल्या पतीच्या श्रापासाठी आपलं जीवन अरण्यात व्यतित केलं. पतिच्या झालेल्या निधनानंतर ज्या धैर्याने तिने पाचही पुत्रांना घेउन हस्तिनापूरची वाट धरली. त्या कुंतिने थोडं तरी धैर्य कर्णासाठी दाखवायला हवं होतं. सार्या जगाला माहित होतं की पांडव हे महाराज पंडूचे पुत्र नसून कुंतिने दुर्वास ऋषींच्या मंत्रातून त्यांना जन्मास घातलं होते. कुंतिला ही याची जाण होती पण तरीही राजकिय दृष्टीकोनातुन असेलती कर्णासाठी कधीही पुढे आली नाही..

यासर्वात मला वृषालीची फार दया येते.अखेरच्या क्षणापर्यंत तिने कर्णावर निरपेक्ष प्रेम केलं.मोठ्या कर्तबगारीने कर्णासारख्या पुरुषाला प्रेमाने सावरलं. ती खर्या अर्थानं कर्णाची अर्धांगिनी होती.

दुर्योधनाने जरी स्वःताच्या स्वार्थासाठी कर्णाला जवळ केलं होतं आणि कर्ण हे जाणुन होता तरीही कर्णाने त्याची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. जर त्या स्पर्धेच्या दिवशी दुर्योधनाने कर्णाला जवळ केलं नसतं तर कदाचित पुढे कर्णाचं काय झालं असतं काय माहीतअश्वत्थामासारखा विचारवंत आणि हुशार मित्र कर्णाला लाभला म्हणून काही अंशी का असेना कर्णाने आपल्या आयुष्याचा निर्धार पक्का केला होता. कर्ण जितका कणखर, अजिंक्य धनुर्धरपराक्रमी, तितकाच भावनिक होतासुर्य आणि गंगामातेवर असलेली त्याची अनामिक निस्सिम भक्ति त्याच्या आयुष्याचा एक भागच होती. अधिररथ आणि राधामाता हेच आपले खरे आईवडील हे त्याने अखेरपर्यन्त मानले आणि मनोभावे त्यांची सेवा केली. कौंतेय असूनही त्याने स्वःताला 'राधेय' मानण्यातच त्याने धन्यता मानली..

कादंबरीच्या शेवटच्या भागात श्रीकृष्ण कर्णाबद्दलची आत्मियता व्यक्त करतो. कर्णाच्या जन्माचं आणि कवच कुंडलांचं रहस्य माहिती असलेल्यांपैकी तो एक होता. त्यानेच कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य कथन केलं. तू सूतपुत्र नाहीस तर सुर्यपुत्र आहेस असं याची जाणिव करुन दिली.वेगवेगळी आमिषं दाखवुन कर्णाला पांडवांस मिळण्यास गळ घातली हे जाणुन ही की कर्ण ते कधीच मान्य करणार नाहीत्यात श्रीकृष्ण सांगतो कीमहाभारताचं युद्ध पेटवलं मी.. का?? फक्त दुर्योधनभिष्म, द्रोण, धृतराष्ट्र अशा काही जणांना धडा शिकवण्यासाठी? द्रौपदीच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी? पदच्युत, पथभ्रष्ट झालेल्या कर्णाला मार्गस्थ करण्यासाठीनाही.. तर माझ्यापुढे प्रश्न होता अखिल मानवजातीचा! प्रश्न होता चिरंतन सत्याचा!...

पण श्रीकृष्णातुझ्या या चिरंतन सत्याच्या? यज्ञात कर्णाची आहुति पडायला नको हवी होती.हा जो तू मानवजातीच्या कल्याणासाठीमांडलेला यज्ञ होता त्याच्या पूर्णत्वासाठी तू कोणाला निवडलं होतंस. पांडवांना????
कसलं सत्य आणि कुणाचं सत्य?
जे सत्य जाणण्यासाठी कर्ण आयुष्यभर फक्त सुर्याकडे हताशपणे बघत राहीला त्याचं सत्य ही तू केव्हा सांगितलंस जेव्हा तुला त्याची गरज होतीकर्णाच्या आहुतिने तुझ्या तथाकथित सत्याचा यज्ञ पुर्णत्वास गेला असा जर तुझा समझ असेल तर जरा आजच्या या युगात एक नजर फिरवं असे अनेक अभागी कर्ण तुला जागोजागी दिसुन येतिल.....    

-
दीप्स

No comments:

Post a Comment