धर्मश्रध्दांची जडवादी चिकित्सा
देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी त्यांच्या ‘लोकायत’ या गंभीर ग्रंथातील एका प्रकरणात इजिप्तमधील दैवतशास्त्राचा आधार त्यांच्या मुख्य लेखनप्रपंचाच्या मजबूतीसाठी घेतला आहे. दैवते कशी जन्माला येतात आणि समाजाला व देशाला ललामभूत वाटणाऱ्या मानचिन्हांचे मूळ कोणते असते हा या शास्त्राच्या शोधाचा विषय आहे. बहिरी ससाणा किंवा बाज हा पक्षी हे इजिप्तचे मानचिन्ह आहे. (भारताचे असे राष्ट्रीय मानचिन्ह तीन सिंह हे आहे.) ते त्या देशाने कां व कसे स्वीकारले याचा जो शोध तिकडच्या संशोधकांनी इजिप्तचा प्राचीन इतिहास व दैवतशास्त्र यांच्या आधारे घेतला त्याचा उल्लेख या ग्रंथात आला आहे. जगभरच्या सगळया समाजांप्रमाणेच इजिप्तचाही प्राचीन समाज एकेकाळी आदिम जमातींच्या स्वरुपात राहणारा होता. या जमाती स्वतःची ओळख त्यांच्या कुलचिन्हांच्या (टॉटेम) नावाने सांगत आणि जपत. आजही जगातले आदिम समूह अशी कुलचिन्हे लावत व सांगत असतात. नागलोक म्हणून ज्यांचा उल्लेख येतो त्या समूहाचे कुलचिन्ह नाग तर हनुमान ज्या जमातीत जन्माला आला तिचे कुलचिन्ह वानर होते. नागकुलोत्पन्न किंवा वानरकुलोत्पन्न अशी ही ओळख आहे आणि मानववंशशास्त्राच्या कोणत्याही विद्यार्थ्याला ती चांगली ठाऊक आहे. (रामायणातील जांबुवंताचे कुलचिन्ह अस्वल तर मकरध्वजाचे मगर हे होते. या कुलचिन्हांच्या उल्लेखांचा आधार घेत आपले पुराणग्रंथ वाचू लागलो की आदिवासींच्या समुदायांच्या तेजस्वी व पराक्रमी इतिहासाचे एक नवे दालनच खुले होते. या दालनाची दारे ठोठावायला पुढे होणे हा आदिवासींना व साऱ्यांनाच त्यांच्या मूळ स्वरुपापर्यंत पोहचण्याचा खरा व प्रशस्त मार्ग आहे.)
प्रत्येकच काळाची एक भाषा असते. ती कालानुरुप बदलतेही. एकेकाळी आपल्याकडे शाळेतल्या हजेरीबुकात मुलांची आडनावे नसायची. त्याऐवजी त्यांची जात लिहिली जायची. अशी जातीने ओळखली जाणारी माणसे एकेकाळी जमातींच्या किंवा त्यांच्या कुलचिन्हांच्या नावाने ओळखली जायची, एवढेच.
इजिप्त हा देश जेव्हा जमातींच्या अवस्थेत जगत होता तेव्हा त्यातही कुलचिन्हांच्या नावाने ओळखले जाणारे समूहगट होते. त्यांच्यात भांडणे होती, हाणामाऱ्या आणि युध्देही होती. अन्न मिळविण्यासाठी होणाऱ्या या जमातयुध्दात ज्या एका जमातीने बाकीच्या बहुसंख्य जमातींचा पराभव करून त्यांना आपल्या हुकूमतीखाली आणले तिचे कुलचिन्ह बहिरी ससाणा हे होते. जेत्यांचे कुलचिन्ह हेच कालांतराने जितांच्या वर्गांचे दैवत बनले. कारण त्या वर्गांनी त्या चिन्हासमोरच शरणागती पत्करून नतमस्तक व्हायचे होते. इजिप्तमध्ये बहिरी ससाण्याला हा मान मिळण्यामागे एवढा सारा इतिहास आहे.
देवीप्रसादांनी या न्यायाने भारतातील देवीदेवतांच्या जन्मांच्या कहाण्या शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गणपती या दैवताला आपल्याकडे अग्रपूजेचा मान आहे आणि त्याला माणसाचा देह आणि हत्तीचे मस्तक आहे. झालेच तर त्या अगडबंब दैवताला उंदीर हे छोटेसे वाहन परंपरेने दिले आहे. वेदांमध्ये येणाऱ्या गणानाम् त्वाम् गणपतीला मानवी शीर आहे. तर महाभारताचे व्यासांनी सांगितलेले श्लोक लिहून घेणाऱ्या गणपतीला हत्तीचे मस्तक आहे. गणपतीच्या या बदललेल्या रुपाचा शोध मांडताना देवीप्रसादांनी बहिरी ससाण्याच्या इजिप्तमधील इतिहासाचा वापर केला आहे.
हत्ती हे कुलचिन्ह असलेल्या जमातीने आजच्या उत्तर भारतातील व विशेषतः बिहार व बंगालच्या परिसरातील इतर जमातींना आपल्या हुकूमतीखाली आणले. परिणामी हत्ती हे जेत्यांचे जमातीचे कुलचिन्ह जितांसाठी दैवत बनले. आपल्या परंपरेत मूर्तीपूजा होती आणि आपली दैवते मानवी तोंडवळयाची व देहाकृतीचीही होती. जेत्यांच्या कुलचिन्हाला दैवताचा मान द्यायचा तर त्याला मानवी देह द्यावा लागला व त्यातून आजचा आपला गणपती गजानन साकार झाला. पुढच्या काळात प्रगत धर्मात स्थान मिळाले तेव्हा त्याला अग्रपूजेचा मानही मिळाला. मग त्याच्या नावावर सूक्ते आली, स्तोत्रे लिहिली गेली आणि महाभारताच्या निर्मितीचे श्रेय त्याला व्यासांसोबत वाटून घेता आले. तो गणांचा म्हणजे जमातींचा पती (नेता) होताच, पुढे त्याला धर्माचे आद्यदैवत होण्याचाही मान मिळाला. हत्ती हे कुलचिन्ह असणाऱ्या जमातीने सर्वात प्रथम ज्या जमातीला पराभूत केले तिचे कुलचिन्ह उंदीर असावे आणि त्याचमुळे उंदीर हा आपल्या आजच्या गणपतीचे वाहन झाला असावा अशी उपपत्ती देवीप्रसादांनी मांडली आहे.
हा सारा तपशील येथे देण्याचे कारण आपल्याकडे दैवतशास्त्राचा म्हणावा तसा विकास अजून झाला नाही आणि दैवते कशी निर्माण होतात याविषयीचे संशोधन समाजाच्या फारशा परिचयाचेही झाले नाही हे आहे. आपल्या प्रतिपादनाच्या पुष्टीसाठी देवीप्रसादांनी दिलेले पुरावेही आपल्या दैवतांच्या जमातोद्भवी स्वरुपावर प्रकाश टाकणारे आहे. तोंडातून लांबवर जीभ काढलेली विक्राळ स्वरुपातली काली ही देवता कधी शंकराला तर कधी गणपतीला पायाखाली तुडवीत असल्याचे दाखविणारी चित्रे आपण पाहिली आहेत. बंगाल व बिहारात तशी शिल्पेही सापडणारी आहेत. देवीप्रसादांच्या मते पराभूत झालेल्या जमातींच्या मनात जेत्यांविषयीचा साचलेला सूडच या चित्रांमधून आणि शिल्पांमधून प्रगट झाला आहे. (दा व्हिन्सी कोड या जगप्रसिध्द कादंबरीतील मोनालिसाच्या चित्राचा लेखकाने लावलेला ऐतिहासिक अर्थ येथे लक्षात यावा.)
देव आणि दैवतांचा हा मानवी इतिहास लक्षात घेतला तर त्यासंबंधीच्या अनेक बऱ्या व चुकीच्या समजुतींची उत्तरे मिळू शकतात. सुग्रीव, हनुमान आणि जांबुवंत रामाला सहाय्य करतात याचा अर्थ रामाच्या बाजूने वानर आणि अस्वल कुळातील सगळया जमाती जातात असा होतो. त्याचबरोबर वानरकुळातील एका गटाचे (सुग्रीव) रावणाच्या कुळाशी असलेले वैर आणि दुसऱ्याचे (वाली) त्याच्याशी असलेले सख्यही स्पष्ट होते. सुग्रीव आणि वालीचे भांडण हे एकाच जमातीतील प्रमुख कुळातले भांडण ठरते. पांडवांनी सर्पसत्र आरंभले याचा अर्थ त्यांनी नागलोकांना हुसकून लावत त्यांच्या ताब्यातील भूभागावर आपली सत्ता कायम केली असा होतो.
हा भाग येथवर थांबतही नाही. तो धर्मग्रंथांच्या गाभ्यापर्यंत जातो. ऋत ही वेदांमधली देवता. सारे ऋतू, ऊन, वारा, पाऊस यांचा नित्यक्रम, पिकांचे उगवणे, स्त्रियांचे ऋतुमती होणे, मुलांचे जन्म, वृध्दांचे मृत्यू आणि सृष्टीतला एकूणच नियमितपणा यावर या देवतेचे नियंत्रण. जोवर पाऊस वेळेवर पडतो, सृष्टीचा सारा क्रम ठरल्यानुसार चालतो आणि ती माणसांच्या अन्नवस्त्रासारख्या गरजा भागवते तोवर वेदांमधले ऋताचे श्रेष्ठत्व कायम असते. वरुण ही देवताही सृष्टीच्या नियमाचे निर्धारण करणारी म्हणून त्यावेळी श्रेष्ठ असते. मात्र पाऊस अपुरा पडला, पिके कमी झाली, अन्नाचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आणि त्यासाठी लढाया कराव्या लागल्या की वरुणाची जागा एका लढाऊ दैवताकडे, इंद्राकडे जाते. मग इंद्र हा देवांचा राजा व वेदातील सर्वशक्तिमान दैवत होतो. समाज आपल्या गरजांप्रमाणे आपली दैवते घडवीत असतो. पशुपालकांच्या टोळयांची सगळी दैवते पुरुषरुपी तर कृषीप्रधान समाजाची दैवते स्त्रीरुपातील असतात. पशुपालनासाठी लागणारे शरीरबळ पुरुषात असते तर शेतीचा शोधच स्त्रीने लावला असल्यामळे असे होते. आपल्या पूजेतल्या साऱ्या देवदेवता निर्मितीशी संबंध असणाऱ्या. त्यातून गौरीची पूजा, शिवलिंगाचे पूजनही त्यामुळेच. या दैवतांची आजची रुपे बरीच प्रतिकात्मक असली तरी त्यांची आरंभीची रुपे कमालीची उघड आणि स्पष्ट होती. हरप्पा-मोहेंजोदारोच्या मूर्तीतील स्त्रीदेवतेच्या जननस्थानातून बाहेर पडणारे पिकांचे कोंभही याच प्रकारातून येणारे. कामाख्य मंदिरात उघडपणे होणारी योनीपूजाही याच स्वरुपाची. मानवी गरज आणि त्यासाठी निर्मितीच्या साधनांची उपासना यातून केवळ दैवतांचीच रुपे घडत नाहीत. ओंकार हेही समागमाचेच प्रतिक असते आणि ते आद्य म्हणून पूजले जाते.
सांख्यांच्या तत्त्वज्ञानात स्त्री कर्तृत्त्वशाली आणि कृतीप्रवण तर पुरुष नाकर्ता असतो. मातृसत्ताक कुटूंबात (मानववंशशास्त्रज्ञांच्या आताच्या मतानुसार मातृवंशाधिष्ठित कुटूंबात) स्त्री स्वामिनी असणारी आणि घर व कुटूंबाचे सर्वाधिकार वापरणारी असते. या कुटूंबात पुरुष घराबाहेर असतो. तो अधूनमधून भेटणारा असतो. अशा समाजाच्या ज्या अवस्थेत मुलांच्या जन्मातला पुरुषाचा सहभाग कोणाला कळला नसतो त्या अवस्थेचे पुढे चालत आलेले हे सांख्यरुप असते. प्रत्येकच भारतीय दैवताची आणि तत्वविचाराची सांगड अशी जडप्रकृतीत चालणाऱ्या व्यवहाराशी घालून दाखविता येते व तशी ती देवीप्रसादांनी घालून दाखविली आहे.
बौध्द आणि जैनांच्या विचारांचा उगमही समाजाच्या तत्कालीन अवस्थांशी आणि त्या अवस्थांत माणसांना भेडसावणाऱ्या प्रश्नांशी घालून दाखविता येणारा आहे. गरजा आणि मागण्या पूर्ण न होण्याच्या अवस्थेत इच्छा जिंका, तृष्णा संपवा किंवा सारे दुःखमयच असल्याचे सांगणारी, संन्यास वा निर्वाणाकडे वळण्याची शिकवण देणारी तत्त्वज्ञाने कां जन्माला येतात याची उत्तरे फारशा चिंतनात न शिरताही हाती येणारी आहेत. राजा बिंबिसार आणि राजपुत्र अजातशत्रू हे दोघेही गौतमाचे शिष्य होते. त्याचे शिष्यत्व पत्करूनही त्यांची सत्तेची तृष्णा तशीच राहिली होती. बिंबिसार वृध्द होऊनही आपल्यासाठी गादी सोडत नाही म्हणून अजातशत्रूने त्याला कैदेत टाकले व मारलेही. पुढे अजातशत्रूचा मुलगा विदुदभा याने अजातशत्रूला कैदेत टाकून स्वतः गादी बळकावली. विदुदभा हा क्रूरकर्मा होता. एका संतापाच्या भरात त्याने कपिलवस्तुतील (प्रत्यक्ष बुध्दाच्या गणराज्यातील) साऱ्या स्त्रीपुरुषांसह आबालवृध्दांची कत्तल केली. हा सारा संहार प्रत्यक्ष पाहावा लागलेल्या त्या परमकारुणिकाच्या संदेशात दुःख आणि तृष्णा यांच्यावर मिळवावयाच्या विजयाखेरीज दुसरे काय असू शकेल?
अलेक्झांडरचे साम्राज्य लयाला गेले आणि साऱ्या मध्य आशियातील समाजांचे ज्ञान व वैभवही संपुष्टात आले. रोमच्या साम्राज्याचा सुवर्णकाळ दूर होता. त्या अंधाऱ्या व उपेक्षित काळात आक्रमणकारी वा विजिगिषु विचार जन्माला येणे शक्य नव्हते. येशूचा सेवाधर्म या संदर्भात तपासून पाहण्याजोगा आहे.
कृतज्ञता बुध्दी हा मानवी स्वभावाचा एक चांगला व नित्याचा विशेष आहे. ज्यांनी समाजासाठी मोठी कामे केली त्यांना दैवत मानू लागणे ही त्याची वृत्तीही त्यातूनच येते. पाणिनी म्हणाला, ‘समाजासाठी मोठी कामे करणारी माणसेच कालांतराने त्या समाजाची दैवते होतात. असे एक उदाहरण नर-नारायणाचे (अर्जुन आणि कृष्ण) आहे.’ महाभारताचा चिंतामणराव वैद्यांनी निश्चित केलेला सनपूर्व 2300 वर्षे हा काळ मान्य केला तर पाणिनी त्यानंतर 1500 वर्षांनी येतो. तोवर कृष्णार्जुन या कर्तृत्वशाली नेत्यांना ईश्वराचे स्वरुप येऊ लागले होते असा व्याकरणकाराच्या या वचनाचा अर्थ आहे. दैवते कशी जन्माला येतात आणि विचारसरणींच्या मागे कोणते वास्तव उभे असते हे असे ध्यानात घेतले की धर्मांच्या उभारणीचे आणि त्यामागच्या ईश्वरी किंवा करुणेच्या वा सेवेच्या प्रेरणांचे स्पष्ट आकलनही होऊ शकते. पाश्चात्य अभ्यासकांनी धर्मसंस्थापकांच्या मानसिक आंदोलनांची जी अतिशय सूक्ष्म उकल करून दाखविली आहे, ती करण्याचे धाडस आपल्याकडे अजून व्हायचे राहिले आहे हेही येथेच नमूद करण्याजोगे. जडवादी दृष्टीकोनातून ईश्वर, धर्म किंवा विचारसरणी यांची लावता येणारी ही उपपत्ती शंभर टक्के खरीच मानावी असे कुणी म्हणणार नाही. मात्र ती या साऱ्या व्यवहाराच्या मूळ स्वरुपावर लक्षात घ्यावा एवढा प्रकाश टाकण्याएवढी प्रभावी नक्कीच आहे. दा व्हिन्सी कोडने प्रकाशात आणलेली रहस्ये किंवा इस्लामच्या निर्मितीमागे उभ्या असलेल्या ईश्वरी प्रेरणांचे मानसिक रुपही असेच आणि त्याविषयीचे आजवर न समजलेले गूढ उकलून दाखविणारे आहे.
(अनेक वाचकांना हा त्यांचा मानसिक छळ वाटणारा अध्ययन प्रकार आहे. मात्र सत्य हे नेहमीच फार सुंदर आणि गोड वगैरे नसते हे मनात आणले की हा छळ काहीसा सुसह्य होणाराही आहे. हा छळ टाळण्याचा एक सोपा मार्गही उपलब्ध आहे. या साऱ्या अध्ययन-विवेचनाची दखल न घेता त्याकडे पाठ फिरविता येते. आपल्यातील अनेकजण तो अनुसरतातही. पाश्चात्य जगाने याआधी असे केले आहे. त्या जगाने स्पिनोझाला वाळीत टाकले आणि कांटला पुन्हा न लिहिण्याची तंबी दिली. गॅलिलिओ आणि कोपर्निकस यांचा त्याआधीचा इतिहास सर्वज्ञात आहे.
आशियायी देशातील जनतेला असले ‘पाखंड’ जन्माला येऊ शकते हेच अजून मान्य व्हायचे आहे. भारतातल्या कितीजणांना देवीप्रसादांची दखल घ्यावीशी वाटली हाही येथे विचार करण्याजोगा प्रश्न आहे. ते तत्वज्ञानाचे अतिशय आदरणीय अभ्यासक होते. राज्यसभेचे सदस्य आणि राजस्थानचे राज्यपालही होते. त्यांचा हा ग्रंथही 1950 च्या दशकात प्रकाशीत झाला. मात्र मराठवाडयातील काही विचारवंतांचा अपवाद वगळला तर त्याची दखल घ्यावी असे कोणाला वाटले नाही. विचार करणाऱ्यांचा जो वर्ग अजूनही अन्यत्र राहिला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवणे हा आपल्या सुरक्षिततेचा मार्ग असल्याचे ठरवून टाकले.)
धर्म, धर्मपुरुष आणि धर्मग्रंथ यांचे अर्थ व गरज काळानुरुप कसे बदलतात याचे आपल्या परिचयाचे उदाहरण भगवत्गीतेचे आहे. गीतेचा देशाला ठाऊक झालेला पहिला गंभीर अर्थ आठव्या शतकातील आद्य शंकराचार्यांचा आहे व तो संन्यासपर आहे. (शंकराचार्यांचा या क्षेत्रातील अधिकार आणि दरारा एवढा की गीतेतील श्लोकांची संख्याही त्यांच्या गीताभाष्यानुसारच निश्चित करण्यात आली आहे) पुढे तेराव्या शतकात झालेल्या ज्ञानेश्वरांनी हाच अर्थ चिद्विलासपर लावला. विसाव्या शतकाच्या आरंभी तो कर्मपर असल्याचे मत लोकमान्यांनी त्यांच्या गीतारहस्यात मांडले. गांधीजींनी गीता हा अहिंसेची शिकवण देणारा ग्रंथ असल्याचा अभिप्राय, त्या ग्रंथावरच्या त्यांच्या आयुष्यभराच्या चिंतनानंतर नोंदविला. दरम्यान रामानुज, मध्व, निंबार्क या विशिष्टाद्वैती, द्वैती आणि द्वैताद्वैती आचार्यांनीही त्यांच्या गीताभाष्यांत याच ग्रंथातून त्यांच्या चिंतनाला अनुकूल असणारे अर्थ काढून दाखविले. सारांश, भगवत्गीतेचे मार्गदर्शन व चिंतन या देशात शंकराचार्यांच्या पश्चात बाराशे वर्षे सुरू राहिले आणि यापुढेही ते थांबणारे नाही. त्यामुळे हा ग्रंथ प्रत्येक शतकाला आणि काळाला मार्गदर्शक ठरणारा आहे असाच त्याचा लौकिक कायम झाला.
चिकित्सक अभ्यास करू पाहणाऱ्याला या संदर्भात पडणारा प्रश्न, गीतेच्या एवढया सगळया अर्थांपैकी खरा व नेमका अर्थ कोणता मानायचा, हा आहे. (ज्ञानेश्वरीवर अधिकारवाणीने बोलणाऱ्या एका मराठी महाराजांना प्रस्तुत लेखकाने हा प्रश्न विचारला तेव्हा ‘माझा गीतेचा अभ्यास अजून व्हायचा आहे’ असे उत्तर देऊन ते थांबले होते.) या पेचातून एका विश्वसनीय मार्गाने बाहेर पडता येते. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर काय किंवा टिळक आणि गांधी काय, ही सगळी लोकोत्तर विद्वत्ता आणि प्रज्ञा घेऊन जन्माला आलेली माणसे आहेत. त्यांचा समाजजीवनावरील प्रभाव आणि त्याविषयीची त्यांची जबाबदारी मोठी आहे. ही माणसे भगवत्गीतेवर गाईड लिहायला कशाला बसतील? सहाव्या शतकापासून समाजात आणि धर्मात होत असलेली नैतिक पडझड आणि वाढीला लागलेला अनाचार थांबवायचा तर शंकराचार्यांना संन्यासवृत्ती आणि कर्मत्याग यांचाच उपदेश समाजाला करणे भाग होते. ज्ञानेश्वरांसमोरचे आव्हान देशावर चालून आलेल्या मोगली आपत्तीपासून आपली प्राचीन संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्याचे आणि समाजमनात तोवर रुजलेल्या चांगल्या श्रध्दा कायम करण्याचे होते. त्यासाठी संन्यासाच्या मागे येणे आणि चिद्विलासाचा विचार मांडणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. हे जीवन नुसतेच निःसार नाही. ते चैतन्याने भरले आहे ही त्यांची शिकवण त्यातून येते. लोकमान्यांसमोरचे आव्हान स्वातंत्र्यप्राप्तीचे आणि त्यासाठी समाजमनात कार्यप्रवणता उभी करण्याचे आहे. ही माणसे गीतेचे अर्थ लिहायला बसली नव्हती. समाजाला जे सांगायचे ते सांगत असताना आपल्या उपदेशामागे गीतेतल्या ईश्वरी वचनांचे बळ उभे आहे हे त्यांना समाजमनावर ठसवायचे होते. शंकराचार्यांचे आणि ज्ञानेश्वरांचे वय लक्षात घेतले तर ती त्यांची गरज होती हे कळते. लोकमान्यांची लोकप्रियता मोठी असली तरी त्यांनाही आपल्या शब्दामागे ईश्वरी वचन उभे करावेसे वाटणे ही त्या काळाचीही गरज होती… अनेकांना हा फार ओढून ताणून आणलेल्या स्पष्टीकरणाचा भाग वाटेल. मात्र अशावेळी त्यांना कोणाचा अर्थ बरोबर आणि कोणाचा चुकीचा वा अपुरा हे सांगण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. अखेर शंकराचार्य, ज्ञानदेव, टिळक किंवा गांधी हे त्यांच्या काळाचेही पुत्र असतात हे येथे विसरता येणारे नसते.
विचार आणि तत्वज्ञान यांनी इतिहास घडतो काय? व्हॉल्टेअर म्हणाला, जगावर पुस्तके राज्य करतात. पण प्रत्यक्षात राज्य पुस्तकांचे असते की ती हाती असणाऱ्यांचे? रशियाचे राज्य दास कॅपिटल या ग्रंथाचे होते की लेनिन आणि स्टॅलीन या जोडगोळीचे? वेद राज्य करतात की त्यातल्या मंत्रांनी अभिषिक्त झालेले राजे? राज्य येशूचे असते की कॉन्स्टँटिनोपलचे आणि पोपचे? इस्लामची राजवट ही तरी शरियतची असते की खलिफांची आणि बादशहांची? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे कधीतरी इतिहासाला द्यावी लागतील आणि वर्तमानाला ती मिळवावी लागतील. ग्रंथांच्या नावाने त्यावर ताबा मिळवणारी माणसेच राज्य करीत असतील तर ती ग्रंथांच्या मूळ प्रयोजनापासून भरकटतच जातात. कारण सत्तेचे प्रयोजन ग्रंथ किंवा ग्रंथांनी प्रतिपादन केलेली मूल्ये हे नसते. सत्तेचे प्रयोजन सत्ता हेच असते. असलेल्या सत्तेचा वापर करून सत्तेत वाढ करायची आणि वाढीव सत्तेचा वापर आणखी मोठी सत्ता मिळवण्यासाठी करायचा. सत्तेला वाढावेच लागते. तिला थांबता वा स्थिर होता येत नाही. तिचे वाढणे थांबले की शेजारच्या सत्ता बळावतात. सत्तेभोवतीची माणसेच तिला आव्हान द्यायला मग उभी होतात. मग सत्ता आणि सत्ताधारी आपल्या सत्तावाढीसाठी ज्या मार्गांचा वापर करतात त्यातला सैन्य आणि शस्त्रवाढीचा मार्ग सर्वज्ञात आहे. त्यासाठी लागणारे अर्थबळ वाढविणे हाही त्याचा एक उपाय आहे. त्याशिवाय जनतेवर स्वामीभक्तीचा संस्कार करण्यासाठी ग्रंथांचा आणि धर्मग्रंथांचाही वापर करता येणारा आहे. सत्तेच्या राजकारणात मंदीर, मशिद आणि पुतळे वापरता येतात तसे ग्रंथ आणि त्यातली शिकवणही वापरता येते. जडवादाचे अध्ययन करताना या साऱ्या वास्तवाचे भान अभ्यासकाला राखावे लागते.
No comments:
Post a Comment