Sunday, September 9, 2012

जनरल मासाहारू होम्मावर चालवला गेलेला खटला…….

जनरल मासाहारू होम्मावर चालवला गेलेला खटला…….

जनरल मासाहारू होम्मा.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
हा लेख लिहायचा मुळ उद्देश जेत्यांचा न्याय कसा असतो हे स्प्ष्ट करणे हा आहे. हा लेख वाचल्यानंतर युद्धात विजय महत्वाचा का असतो हे आपल्या लक्षात येईल. हा लेख वाचल्यावर आपल्या मनात बर्‍याच शंका निर्माण होतील त्याचे शंका निरसन करण्याचे प्रयत्न केला जाईल. बरेच प्रश्न उत्तर देण्यासाठी अवघड असतील याची कल्पना आहे……
१९४५ साली डिसेंबर महिन्याच्या सोळा तारखेच्या सकाळी ले. रॉबर्ट पेल्झ एका निर्दय माणसाला भेटायला निघाला होता. पेल्झ लष्करी न्यायालयाचा एक वकील होता आणि सध्या मॅनिला येथे त्याची बदली झाली होती. त्याच्या स्वप्नातही नव्हते की त्याला जपानी युद्धगुन्हेगारांवर चालवलेल्या खटल्यात भाग घ्यावा लागेल आणि ते सुद्धा आरोपीचा वकील म्हणून. अमेरिकेला फिलिपाईन्सच्या बटान बेटावर युद्धात अमेरिकेला पाणी पाजलेल्या जपानच्या सेनेचा सेनानी जनरल मासाहारू होम्मा याच्यावर सगळ्यात महत्वाचा खटला चालवला जाणार होता आणि कायद्याने त्याचे वकीलपत्र पेल्झला घेण्याचा हुकूम झाला होता. एका महिन्याच्या आत म्हणजे ३ जानेवारी १९४६ ला हा खटला उभा राहणे अपेक्षित होते.
एका शत्रूची बाजू मांडण्याची पेल्झला मनातून खरे तर भितीच वाटत होती. कारणही तसेच होते जनरल होम्माला बटानचा पशू म्हणून ओळखले जात होते. दहा हजार, अमेरिकन आणि फिलिपाईन्सच्या सैनिकांच्या उपासमारीने झालेल्या मृत्यूला त्याला जबाबदार धरण्यात आले होते. अमेरिकन सैन्याने शरणागती पत्करल्यावर त्यांना बटानपासून लुझॉनच्या छावणीत चालवत नेण्यात आले. या प्रवासात त्यांना पाणी व अन्न अशा चैनीच्या वस्तूही नाकारण्यात आल्या होत्या. या प्रवासाला जगात “डेथ मार्च ऑफ बटान” या नावाने ओळखण्यात येते. याची कल्पना आपल्याला खालील छायाचित्रांवरून येऊ शकेल.
डेथ मार्च ऑफ बटान-नकाशा….
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
उपासमार…..
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
मृत्यू….
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
पण त्या इतिहासात आत्ता जायला नको कारण मग या खटल्याची हकिकत बाजूला राहील. १९४५ च्या सप्टेंबर महिन्याच्या मध्यास जपानच्या सैन्याने शरणागती पत्करली आणि जनरल होम्मा जपानमधे अमेरिकन सैन्याच्या हाती लागला. त्याने हाराकिरी केली नाही हेही एक आश्चर्यच आहे. अमेरिकेने रातोरात त्याला गुपचूपपणे विमानाने मॅनिलाला हलविले आणि त्याच्यावर खटला भरवण्याचा निर्णय झाला. याच जनरल होम्माला पेल्झ आणि त्याचे चार सहकारी भेटण्यासाठी हाय कमिशनर पॅलेसमधे त्याच्या भेटीची वाट पहात बसले होते. हाच तो पॅलेस जो जनरल होम्माने दोनच वर्षापूर्वी आपले निवासस्थान व कार्यालय म्हणून वापरला होता.
दरवाजा उघडला आणि जनरल होम्मा आत आला. दिसायला रुबाबदार आणि वयाचा पत्ता न लागू देणारे त्याचे व्यक्तिमत्व कोणावरही छाप पाडेल असेच होते. (त्याचे त्यावेळी वय सत्तावन्न होते) जपानची उंचीची सरासरी सुधरवणारी त्याची सहा फूट उंची, व अंगात घातलेला पिवळसर झाक असलेला पांढरा सूट याने त्याच्या रुबाबात अजूनच भर पडली होती. आल्या आल्या जनरल होम्माने जपानी पद्धतीने त्याची वाट बघत असलेल्या वकीलांना लवून अभिवादन केले आणि त्याच्या कोटाच्या खिशातून त्याने एक कागद काढला.
“हे मी तयार केलेले भाषण आहे” असे म्हणून त्याने ते त्याच्या वरच्या पट्टीतील आवाजात पण ठाम व मृदू स्वरात वाचून दाखवले. वाचून झाल्यावर त्याने हजर असलेल्या पेल्झ आणि त्याच्या सहकार्‍यांचे त्यांच्या निपक्षपातीपणासाठी आभार मानले व अमेरिकन सेनादलाने त्याची बाजू मांडण्यासाठी वकील नियुक्त केल्याबद्दल सेनादलाचेही आभार मानले. जनरल होम्मा उत्कृष्ट इंग्रजी बोलत होता व त्याचे उच्चार ब्रिटिश वळणाचे होते.
मॅनिलाचे न्यायालय हे टोक्योमधे स्थापन होत असलेल्या न्यायालयापेक्षा भिन्न होते कारण मॅनिलाचे हे न्यायालय पूर्णत: लष्कराच्या अंमलाखाली चालणार होते. (असे पूर्वी कधी झाले नव्हते. परत एकदा असे न्यायालय स्थापन झाले ते अफगाणिस्तान आणि इराकच्या युद्धानंतर). जनरल होम्माला “तृतीय दर्जाचा” युद्धगुन्हेगार ठरवून पाच लष्करी न्यायाधिशांच्या समोर हा खटला चालवला जाणार होता. हा दर्जा ज्या सैनिकांनी युद्धभूमीवर अत्याचार केले त्यांना दिला जाई. हे खटले शक्यतो ज्या भूमीवर हे गुन्हे घडले त्याच भूमीवर चालवले जात. “ए” आणि “बी” हा दर्जा राजकारणी व वरीष्ठ अधिकार्‍यांना दिला गेला होता व वर निर्देश केलेल्या टोक्यो येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांच्यावर खटले भरले जाणार होते.
मॅनिलाचे न्यायालय व त्याच्या समोर चालणारे हे खटले त्यामुळे अटळ होते. मॅनिला येथे जिंकलेली सेना पराजित सेनेवर खटला चालवणार होती. दोस्त राष्ट्रांच्या सेनेच्या पॅसीफिक विभागाचा सर्वोच्च कमांडर जनरल डग्लस मॅकार्थर या खटल्यांची जागा, बचाव पक्षाची रचना, न्यायाधीश, साक्षीपुराव्यांचे नियम हे सगळे हा माणूस ठरवणार होता आणि ज्या माणसा विरूद्ध त्याने लढाई लढली व हारली त्याच माणसाच्या विरुद्ध.
जनरल होम्माविरूद्ध आंतरराष्ट्रीय युद्ध कायद्यानुसार एकंदरीत अठ्ठेचाळीस गुन्हे दाखल करण्यात आले होते पण या पहिल्याच भेटीत त्याने त्याच्या वकीलांना हे सर्व गुन्हे तो अमान्य करणार आहे हे निक्षून सांगितले. जपानच्या चौदाव्या आर्मीच्या कमांडर या नात्याने त्याची नैतिक जबाबदारी स्विकारायची तयारी होती पण हे गुन्हे घडले आहेत हेच त्याला माहीत नव्हते, तर तसा हुकूम करायची बात दुरच असे त्याचे ठाम म्हणणे होते. सगळ्या आरोपांपैकी बटान डेथ मार्चच्या संदर्भात असलेल्या आरोपामधे बचाव करणे सगळ्यात अवघड असेल हे त्याला माहीत होते. त्याच्या एकूण बोलण्यावरून असे वाटत होते की त्याला बटान डेथ मार्चची पुसटशीच कल्पना होती. “मला बटान डेथ मार्चबद्दल पहिल्यांदा कळाले ते अमेरिकन वार्ताहरांनी त्याबद्दल विचारल्यावर”.
जनरल होम्माचा द्वेष वाटण्या ऐवजी पेल्झ आणि त्याच्या सहकार्यांबना तो आश्चर्यकाररित्या आवडू लागला. पेल्झने त्याच्या रोजनिशीत नोंद केली, “ हा माणूस प्रसन्न व्यक्तिमत्वाचा आणि उच्च नीतीमत्ता असलेला आहे”.
नशीबाचे खेळ कसे असतात बघा, जनरल होम्मा हा युद्धाअगोदर जपानमधे पाश्चिमात्य देशांचा पाठीराखा व पूर्णपणे आंग्लाळेला म्हणून माहीत होता आणि त्यालाच अमेरिकेच्या ताब्यातील फिलिपाईन्सवर हल्ल्याचे नेतृत्व स्विकारण्याचा हुकूम झाला. युद्ध सुरू व्हायच्या अगोदर जनरल होम्मा ब्रिटनमधे जपानच्या वकिलातीत लष्करी सहाय्यक म्हणून काम करत होता.
जनरल होम्माची कहाणी ऐकून पेल्झ चाट पडला. ज. होम्माने जगभर प्रवास केला होता आणि ज्या माणसांना तो भेटला होता त्याची यादी बघितल्यावर कोणालाही झीट येईल. ज्या माणसांना भेटला त्यांच्याशी त्याची वैयक्तिक ओळख होती. तो पाचव्या जॉर्जच्या राज्याभिषेकाला हजर होता, पॅलेस्टाईन व अफगाणीस्तानला गेला होता आणि भारतात कैक वर्षे राहिला होता. तो भारतात असताना महात्मा गांधींनाही भटला होता. चर्चिल, मुसोलिनी या नेत्यांशी त्याची भेट झाली होती. अमेरिकेला त्याने अनेक भेटी दिल्या होत्या. अशाच एका भेटीत न्युयॉर्कच्या मेयरने त्याला नव्यानेच बांधलेल्या एंपायर स्टेट टॉवरच्या शेवटच्या मजल्यावर खास पाहुणा म्हणून नेले होते.
जनरल होम्माने त्याच्या बचावासाठी काळजीपूर्वक व अभ्यास करून मुद्दे तयार केले होते. त्याच्या विचारमग्न चेहर्‍यावर हा ऐतिहासिक खटला जिंकण्याचा निर्धार कायम दिसत असे. त्याच्या पहिल्या भेटीनंतर पेल्झने त्याच्या रोजनिशीत नोंद केली, “जनरल होम्मा मला शेवटच्या प्रवासाला निघालेल्या एखाद्या आजोबांसारखा भासला ” जनरल होम्माला त्याची ही शेवटची लढाई तो जिंकू शकत नाही याची कल्पना होती कारण त्याच्या एका नोंदीत त्याने लिहिले होते, “पराजितांना खरा न्याय मिळत नाही. मी गुन्हेगार आहे या ठाम गृहितकावरच ते खटला चालवतील याची मला पूर्ण खात्री आहे. वाचण्याची शक्यता नाही. कधी कधी रात्री मला उदास व हतबल असल्याची चीड येते”.
हा खटला संपल्यानंतर अनेक वर्षांनी जेव्हा रॉबर्ट पेल्झची मुलाखत घेण्यासाठी एक मुलाखतकार त्याच्या ऑफिसमधे गेला तेव्हा त्याचे वय जवळजवळ ८८ झाले होते. तो त्याची आवडती होंडूरासमधे तयार झालेली सिगार ओढत होता व त्याच्या टेबलावर जनरल होम्माचे त्याने स्वत: सही केलेले छायाचित्र होते. ते छायाचित्र हातात घेऊन त्याच्याकडे किलकिल्या नजरेने बघत म्हातारा पेल्झ त्या वार्ताहराला म्हणाला, “एकदम सभ्य गृहस्थ होता जनरल होम्मा ! एकदम छान माणूस !”
पेल्झबरोबर त्या खटल्यादरम्यान काम करत असलेले त्याचे उरलेले चार सहकारी केव्हाच स्वर्गवासी झाले होते. पेल्झ गंमतीने म्हणाला “ बरे झाले तुम्ही योग्य वेळी आलात नाहीतर तुम्हाला मला भेटायला स्वर्गातच यावे लागण्याची शक्यता होती.”
मॅनिलाचा युद्धज्वर अजून उतरला नव्हता. बटानच्या पशूबद्दल रोज नित्यनेमाने कहाण्या छापून येत होत्या. काही अतिरंजीत होत्या तर काहीत वाट्टेल ते लिहिले होते. या खटल्यावर याची छाया पडली होतीच तर पण या खटल्याला वैयक्तीक सूडाची एक सूक्ष्म झालरही होती. जनरल डग्लस मॅकार्थरने या युद्धभूमीवरून माघार घेत ऑस्ट्रेलियाला पळ काढला होता तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर उतरताना त्याने कडवटपणे प्रतिज्ञा केली होती “मी परतेन ! निश्चितच परतेन !” बटानचा डेथ मार्च होऊन चार वर्षे होऊन गेली होती पण कोणाच्याच मनातून तो अपमान जात नव्हता. सूडाच्या आगीची धग कमी न होता योग्य संधीची वाट पहात होती. ती आता आली. जरी मॅकार्थर दूर जपानमधे गूंतला होता तरी त्याचे अस्तित्व खटल्याच्या हरएक कोपर्‍यात, कागदाच्या कपट्यावर, त्या न्यायालयाच्या आवारात जाणवत होतेच.
आज ८८ वर्षांचा असताना पेल्झचे डग्लस मॅकार्थर बद्दल तेच मत होते – “एक अत्यंत अहमंन्य माणूस. एक चांगला सेनानी पण बदमाश !” आणि अशा माणसाने हे न्यायलय उभे केले होते……………….
जनरल डग्लस मॅकार्थर
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
जनरल होम्माच्या वकिलांना त्याला या घडलेल्या गुन्ह्यांची माहिती नव्हती एवढेच सिद्ध करून चालणार नव्हते कारण तसे केले तर हा खटला कमांडच्या जबाबदारीवर घसरला असता. युद्धभूमीवर सैन्याचा सेनानी असताना तो कागदोपत्री जरी निर्दोष ठरला असता तरी त्याला जे चालले आहे त्याची माहिती असायलाच हवी होती व त्यात त्याने हस्तक्षेप करायला हवा होता असे विरूद्धपक्षाने म्हणणे मांडले असते.
अमेरिकेच्या सेनेविरूद्ध लढणार्‍यांना नेहमीच वेगळा कायदा लावला जातो. हा कायदा जर कायदा असेल तर इराक व अफगाणीस्थानमधे अमेरिकन सैनिकांनी जे काय केले त्याबद्दल त्यांच्या कमांडरला दोषी ठरवायला पाहिजे होते. पण अमेरिकेच्या बाबतीत तसे होत नाही हे खरे ! असो !
पेल्झ या खटल्याच्या निमित्ताने जनरल मासाहारू होम्माला दोन महिने तरी रोज भेटत असे. तो, त्याचे सहकारी व मासाहारू होम्मामधे या भेटींमुळे बर्‍यापैकी जवळीक निर्माण झाली होती. या खटल्याचा निकाल लागल्यावर पेल्झने मासाहारू होम्माच्या निराश पत्नीला टोक्योला सोडले. या भेटीदरम्यान त्याने त्या उध्वस्त शहरात त्या बिचार्‍या फुजिको होम्माचा पाहुणचार घेतला. त्याच वेळी त्याने होम्माचे नातेवाईक व मित्रमंडळींच्याही गाठीभेटी घेतल्या. त्या गाठीभेटींमुळे त्याची एका नवीन जगाशी ओळख झाली. ही ओळख त्याने बरीच वर्षे पत्रव्यवहाराने जपली.
जसा जसा खटला पुढे जाऊ लागला तसे ज.होम्माचे व्यक्तिमत्व त्याला अधिकच गुंतागुंतीचे वाटू लागले. दुर्दैवाने त्याच्यावर योग्य प्रकाराने खटला चालवण्यात येणार नाही हे पेल्झच्या लक्षात आले. बटानच्या या पशूवर अमेरिकन कायद्याच्या प्रक्रियेने खटला चालवल्यास अनेक अडचणी येऊ शकतात हे त्यांच्या लक्षात आले होते. पण अमेरिकन सेना या अशा अडचणींवर उद्धटपणाने मात करते हे जगात सगळ्यांनाच माहीत आहे. शिवाय होम्माला खलनायक ठरवणेही कठीण होते कारण त्याचा पुर्वेतिहास तसा नव्हता. एकतर तो राजेशाहीच्या/एकाधिकारशाहीच्या विरूद्ध होता. दुर्दैवाने त्याला त्या एकाधिकारशाहीच्या बाजूने युद्ध लढावे लागले व त्यासाठी आपल्या प्राणाची किंमतही मोजावी लागली.
लष्करी परंपरा असलेल्या घराण्यात ज. मासाहारू होम्माचा जन्म झाला. त्याचे वडील एक श्रीमंत जमिनदार होते. तरूण होम्माची प्रगती नेहमीच वादाच्या भोवर्‍यात अडकत असे त्यातच त्याची सूंदर गेशांबरोबरच्या जवळीकीबद्दल त्या काळात अनेक वावड्या उडत असत. लष्करातील अनेक महत्वाच्या पदावर काम करताना त्याने आपल्या कामाची छाप उठवली होती. १९३० साली जपानच्या लष्करी प्रचार खात्याच्या प्रमुखपदी काम करताना त्याच्यातील साहित्यिक गूण उजेडात आले असे म्हणायला हरकत नाही. त्याच काळात त्याने जपानच्या अनेक प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रकारांशी व नाटककारांशी दोस्ती केली. त्याला एक विचित्र सवय होती. तो ऐन युद्धात कविता करायचा. जपानच्या चौदाव्या आर्मीमधे त्याला “कवी ह्रदयाचा जनरल असेच ओळखत.
तरूण होम्माच्या जवळच्या लोकांना त्याचा स्वभाव त्याच्या व्यवसायाशी विसंगत आहे असे ठामपणे वाटत असे. जपानी भाषेमधे जनरल होम्माचे चरित्र लिहिणार्‍या लेखकाला त्याच्या मित्रांनी होम्माची एक आठवण सांगितली, “ आम्ही त्याच्या बरोबर सिनेमाला जायचे टाळत असू कारण हा एखादा दु:खद प्रसंग सूरू झाला की रडायचा थांबतच नसे.” होम्माच्या मुलाने, मासाहिको होम्माने त्याच्या आठवणीत सांगितले, “एक दिवस आम्ही आमच्या घराभोवती फिरत असताना कुंपणाला एकच अणकुचीदार बांबू राहिला होता. माझ्या वडीलांनी तो ताबडतोब खेचून बाहेर काढला. मी त्याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले ’इतर बांबूमधे तो किती क्रूर दिसत होता.”
होम्माचा जन्म होंशू किनारपट्टीवरील साडो बेटावर झाला. या बेटावर असंख्य देवळे व मठ आहेत त्यामुळे या शहराचे वातवरण थोडेसे गूढ व परंपरावादी, कर्मठ आहे. हा कर्मठपणा त्यांच्या भाषेतही थोडासा डोकावतो. या गावात जनरल होम्माला अजूनही मोठा मान आहे. असणारच ! कारण हा एकमेव असा जनरल आहे की ज्याने अमेरिकेच्या एका मोठ्या सेनेला हरवून त्याच्या सेनापतीला पळून जायला भाग पाडले होते. हाटानो गावात १८८१ साली बांधलेले होम्मा घराण्याचे घर तेथे एका हिरव्यागार टेकडीवर अजूनही उभे आहे. त्या टेकडीपासून समुद्रापर्यंत पसरलेली हिरवीगार भात शेती परंपरेने होम्माच्या घराण्याकडे चालत आलेली होती. अशा श्रीमंत घराण्यात मासाहारू होम्माचा जन्म झाला होता.
ज्या लेखकाने पेल्झची मुलाखत घेतली होती तो एका पुस्तकासाठी हाटानोला मासाहारू होम्माच्या मुलाला, मासाहिको होम्माला भेटायला गेला होता. हाही त्याच्या वडिलांच्या वळणावर गेला होता. दिसायलाही वडिलांसारखा आणि व्यवसायानेही वडीलांसारखा. १९४३ साली त्याच्या तुकडीला रशियन फौजांनी कुरिल बेटांवर पकडले व सायबेरियाला छावण्यात पाठवून दिले होते. या छावण्यांमधे साठ हजार पेक्षा जास्त जपानी सैनिक मृत्यूमुखी पडले. पाच वर्षे तेथे काढून मासाहिको साडोवर परत आला. आल्यावर त्याला त्याच्या वडिलांची ह्रदयद्रावक हकीकत कळाली. मासाहिकोने ख्रिश्चन धर्म स्विकारला आणि त्याने शाळामास्तरचा व्यवसाय स्विकारला. तो त्याच्या वडिलांबद्दल क्वचितच बोलत असे. त्याच गावात एका शांत जागी जनरल होम्माच्या नावाने एक शिंटो मंदीर बांधण्यात आले आहे. युद्ध संपल्यावर त्याच्या नावाची एक शिळा त्याच्या कुटुंबियांनी तेथे उभी केली व जनरल होम्माचे केस व काही वस्तू ज्या त्याच्या मुलाने फिलिपाईन्समधून मिळवल्या होत्या त्या शिळेखाली पुरण्यात आल्या.
जपानी माणसाची संस्कृती व विचार करायची पद्धत ही जगातील इतर लोकांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी त्या लेखकाने त्याचा एक अनुभव सांगितला. ( खरे तर हे सगळे सापेक्ष आहे)
तो लेखक लिहितो, “एका दुपारी मी मासाहिकोशी गप्पा मारताना तो म्हणाला, “माझे वडील मला कधीच ओरडले नाहीत. त्या काळात वडिलांनी मारून मुटकून मुलाला शिस्त लावायची हीच पद्धत होती पण माझे वडील मला बेसबॉलच्या मॅचेस बघायला घेऊन जायचे. ते फार प्रेमळ होते. त्यांचा काही गून्हा असेल तर तोच आहे.” त्याच संध्याकाळी आम्ही जेवायला एका अस्सल जपानी रेस्टराँमधे गेलो. या रेस्टराँची खासियत होती साडो पद्धतीने शिजवलेले समुद्रातील शिंपल्यातील मास. (Abolone). जपानी पद्धतीप्रमाणे आम्ही बूट काढून शांतपणे त्या चौरंगावर स्थानापन्न झालो. प्रत्येकाच्या समोर एक छोटा चौरंग होता ज्यावर तो मोठा शिंपला ठेवला होता व त्याच्या खाली गॅसचा एक बर्नर. आम्ही बसल्यावर आमच्या समोर वाकून तेथील वेटरने आमच्या समोरच्या मोत्याप्रमाणे चमकणार्‍या रंगीबेरंगी शिंपल्याखालचे बर्नर चालू केले. थोड्याच वेळात त्या शिंपल्यामधून बारिक आवाज यायला लागले व त्यातील मास शिजायला लागले. दोनच मिनिटांनी त्यातील प्राण्यानी स्वत:चे अंग गुंडाळायला सुरवात केली तेव्हा मला कळाले की शिंपल्यातील तो प्राणी जिवंत आहे. दुसर्‍याच क्षणी तो प्राणी त्या शिंपल्यात आचके देत मरून पडला. तो पर्यंत त्याचा चमचमीत सुवास सगळीकडे पसरला होता. हे सगळे अगदी व्यवस्थीत जपानी शिष्टाचाराने होत होते पण मला तो प्राणी मरताना पाहून कसेसेच झाले. ते बघून माझ्याबरोबर असलेला बौद्ध भिख्खू म्हणाला “हे किती निर्दय वाटते ना ? पण साडोमधे शिंपले खाण्याची दुसरी पद्धतच नाही “………………
जनरल होम्माचा खटला त्या विशेष न्यायालयात ३ जानेवारीला उभा राहिला. हे न्यायालय मॅनिलाच्या हायकमिशनरच्या कार्यालयात भरवले गेले होते. ढासळलेल्या या इमारतीचा पूर्वीचा रूबाब अजूनही शाबूत होता. या खटल्या दरम्यान हे न्यायालय नेहमीच गच्च भरलेले असायचे.
प्रत्येक दिवशी जनरल होम्मा सूट परिधान करून न्यायालयात येत असे व त्याच्या कोटाच्या खिशात पांढरा स्वच्छ रूमाल लावलेला असे. त्याच्या डाव्या बाजूला स्टेनोग्राफर व त्यांच्या मागे जपानी दुभाषे बसत. समोर डग्लस मॅकार्थरने निवडलेले पाच न्यायाधीश बसत. हेच ज्यूरीही असणार होते. प्रमुख न्यायाधीश होता मे. जनरल डोनोव्हन. इतर चारांची नावे होती –ब्रि. ज. ऑर्थर, वारन मॅकनॉट, रॉबर्ट गार्ड व मे. ज. वाल्डेस. ( याच्या भावाचे एका जपानी सैनिकाने डोके उडविले होते)…….
त्यावेळी मॅनिला शहरात जे वातावरण होते त्याचा विचार केल्याखेरीज या न्यायाधिशांच्या मनात काय चालले असेल याचा अंदाज करणे चुकीचे होईल. त्यावेळी फिलिपाईन्समधे जपान विरूद्ध राग धुमसत होता. बटानचा पशू हा शब्द गल्ली बोळातून त्वेषाने उच्चारला जात होता व सूडाची सतत मागणी होत होती. जनरल होम्माला सतत खलनायक म्हणून पुढे आणले जात होते.
पेल्झ व त्याचे सहकारी. पेल्झ उभे असलेल्यांमधे उजवीकडून दुसरा.

या अशा महत्वाच्या माणसाच्या बचावासाठी अमेरिकन सेनेने फारच अनुभवी वकीलांची फौज दिली होती. या वकिलांच्या चमूचा प्रमुख होता कॅप्टन जॅक स्कीन. याचे वय होते २७ आणि याने आजपर्यंत एकाही खटल्यात साधे भाषणही केले नव्हते. जेव्हा त्याला हे कळाले तेव्हा त्याने त्याच्या बायकोला पत्रात लिहिले, “मी आता प्रसिद्ध, गरजेचा व वेडा झालो आहे. अजून काही दिवसांनी मी या धक्क्यातून बाहेर येईन व त्या नालायक माणसाच्या बचावासाठी उभा राहेन”
दुसरा होता कॅप्टन जॉर्ज फरनेस. हा जमिनीचे खटले चालवायचा. तिसरा होता पेल्झ जो सगळ्यात तरूण होता. तो नवखा असला तरी त्याने या खटल्यात त्याच्या पेशाला शोभेल अशी कामगिरी केली असे म्हणावे लागेल………..
जनरल होम्मा….तुरूंगात.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

No comments:

Post a Comment