Sunday, September 9, 2012

जपानी....कामीकाझे…..

कामीकाझे…..


जपानी माणसाने चार ओळी खरडल्या तरी त्याला एक प्रकारचा गूढ अर्थ प्राप्त होतो हेच खरे. त्यांच्या झेन गोष्टीच बघा किंवा हायकू बघा. मी एक हायकू वाचली होती ती अशी काहीतरी होती. माझा त्याचा अभ्यास नाही पण त्यातील गूढ अर्थ माझ्या चांगला लक्षात राहिला होता…तो असा काहितरी होता…
फासा
चार चेहरे.
प्रयत्न
दु:ख
याचा अर्थ असा आहे की तुम्ही कितीही नियंत्रण करायचा प्रयत्न केला तरी फेकल्यावर फासाच्या एका तरी चेहर्‍यावरचे दान पडतेच आणि मग ते कुठले आहे हे समजून काय करणार…शेवटी दु:खच…. असे काहितरी.

आता ही हायकू बघा..
वसंत ऋतूत ती फुलतात मग विरतात
आयुष्य एखाद्या नाजूक फुलासारखेच आहे
सुगंध त्याचा कसा राहील
कायमचा ?

ही हायकू रचली होती जपानच्या एडमिरल ताकिजिरो ओनिशी याने. याच माणसाने कामिकाझेसाठी वैमानिकांची भरती केली होती. कामिकाझेचा शब्दश: अर्थ “स्वर्गीय वारा” किंवा दुसर्‍या शब्दात सांगायचे तर इश्वरी कृपा. आज आपण कामिकाझेची गोष्ट ऐकणार आहोत. आता कामिकाझे असणे/होणे चूक का बरोबर हे आपण जे झाले त्यांच्यावर सोडू आणि आपल्याला यातून प्रखर देशभक्ती म्हणजे काय हे कळाले तरी मी म्हणतो या लेखाचे काम झाले. ही गोष्ट कमांडर तादाशी नाकाजिमा यांच्या लेखावरून लिहिली आहे.
१९४४ साली फिलिपाईन्समधे माबलाकातच्या जपानी विमानतळावर जपानच्या २०१ एअर ग्रूपचा तळ होता. १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या उदास सावल्या त्या विमानतळावर पसरत असतानाच एक काळी कुळकुळीत गाडी त्या विमानतळाच्या मुख्यालयासमोर थांबली आणि त्यातून एडमिरल ताकिजिरो ओनिशी बाहेर पडला. जपानच्या १ क्रमांकाच्या स्क्वाड्रन कमांडर असलेला हा अनुभवी हवाईदलाचा अधिकारी, हवाई युद्धाचा तज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध होता. त्याने आल्या आल्या सर्व वैमानिकांची आणि त्यांच्या अधिकार्‍यांची बैठक बोलवली आणि फालतू बडबड न करता त्याने मुद्द्याला हात घातला.
“परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. जपानच्या साम्राज्याचे भवितव्य “शो” वर अवलंबून आहे. (फिलिपाईन्स शत्रूच्या ताब्यात परत जाऊ नये म्हणून जी योजना आखली गेली होती तिचे नाव होते ’ऑपरेशन शो’. या पराजयाच्या जवळ आलेल्या काळात या शब्दाचा अर्थ मोठा उपहासपूर्ण वाटत होता. त्याचा अर्थ आहे ’विजय’) एडमिरल कुरिटाच्या अधिपत्याखाली एक नौदल लेतेच्या आखातात आक्रमण करून तेथील शत्रूला कंठस्नान घालणार आहे. यासाठी या पाण्यात शत्रूच्या बोटींना मज्जाव करायची कामगिरी १-स्क्वाड्रनवर सोपवण्यात आली आहे. कमीत कमी एक आठवडा आपल्याला हे संरक्षण पुरवायचे आहे. पण पारंपारीक युद्ध करून शत्रूच्या या बोटी बुडवणे आपल्याला शक्य नाही. माझ्या मते शत्रूची ही विमानवाहू जहाजे जर त्यांच्या धावपट्टीवर आपल्या विमानांनी धडक मारून ती उध्वस्त केली तरच हे शक्य आहे. यासाठी आपली झिरो फायटर विमाने उपयोगी पडतील. त्यात २५० किलो स्फोटके सहज जाऊ शकतात”
त्यांना काय करायचे होते त्याचे चित्र. अर्थात हे खरे आहे.

ते ऐकून, एकणार्‍यांच्यात विरश्री संचारली. त्याच्या या भाषणाचा अर्थ न कळण्याइतके ते दुधखुळे नव्हते. तो त्यांना त्याच्या आत्मघातकीपथकात सामील व्हा असे आवाहन करायला आला होता. त्याचे भाषण संपल्यावर २०१- एअर ग्रूपच्या कमांडर तामाईने त्याच्या स्क्वाड्रन लिडर्सशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. हे ऐकल्यावर त्याचे बहुतेक करून सर्व वैमानिक या आत्महत्येला तयार होतील अशी त्याला खात्री होती. “ते सर्व जण चुपचाप होते पण त्यांचे डोळे बोलत होते. व जे अनेक वाक्यात सांगता येणार नाही ते एका नजरेत सांगत होते ’हो आम्ही जाणार’”. कमांडर तामाईने नंतर त्याच्या आठवणीत सांगितले आहे. फक्त दोघांनी या कामगिरीसाठी नकार दिला.
या पहिल्या हल्ल्याचे नेतृत्व लेफ्टनंट युकिओ सेकी करणार होता, हा एक बुद्धिमान, अत्यंत प्रामाणिक असा अधिकारी होता आणि त्याने त्याचे प्रशिक्षण जपानच्या इता जिमा नॅव्हल एकॅडमीमधून पूर्ण केले होते. जेव्हा कमांडर तमाईने सेकीला मोहिमेबद्दल सांगितले तेव्हा त्याने समोरच्या टेबलावर आपले दोन्ही कोपरे टेकले. हाताच्या पंजांनी आपल्या हनुवटीला आधार दिला आणि डोळे बंद केले.
या तरूण अधिकार्‍याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याच्या डोळ्यासमोर त्याची सुंदर पत्नी व स्वप्ने तरळली. दोन सेकंदानंतर त्याने डोळे उघडले, मान वर करत तो म्हणाला “ठीक आहे मी हे नेतृत्व स्विकारतो”.
२० ऑक्टोबरला सूर्योदय झाल्यावर एडमिरल ओनिशी याने कामगिरीवर जाणार्‍या २४ कामिकाझेंना बोलवले आणि त्यांना त्यांची कामगिरी समजाऊन सांगितली. ती सांगतांना त्याच्या सारख्या कसलेल्या व युद्धात ताऊन सुलाखुन निघालेल्या कमांडरचाही आवाजातला कंप जाणवत होता.
“जपान एका अत्यंत भीषण आपत्तीला सामोरे जात आहे. या आपत्तीतून बाहेर पडणे हे आपले राजे, त्यांचे मंत्रीमंडळ आणि माझ्या सारख्या कनिष्ट दर्जाच्या अधिकार्‍यांच्या शक्तिबाहेरचे आहे. आता जपानचे भवितव्य तुमच्या सारख्या तरूणांच्या हातात आहे” त्याच्या डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब ओघळले ते त्याने लपविले नाहीत. (ही एक अशक्य कोटीतील गोष्ट मानली जाते) “जपानसाठी जे काही करता येईल ते करा त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो”.

इतर विमानतळावरही कामिकाझेसाठी याच प्रकारची भरती चालली होती. सेबूच्या विमानतळावर २० ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता सगळ्यांना एका सभागृहात जमविण्यात आले. त्यांना संबोधीत करत कमांडर म्हणाला
“या विशेष कृतीदलात ज्याला भाग घ्यायचा आहे त्याने एका कागदावर आपले पद व नाव लिहून तो कागद एका लिफाप्यात घालून, ते बंद करून माझ्याकडे द्यायचे आहे. ज्याला जायचे नाही त्याने कोरा कागद लिफाप्यात घालावा. तुम्हाला विचार करायला तीन तास देण्यात येत आहेत”.

रात्री ९ वाजता एका वरीष्ठ आधिकार्‍याने एक पाकीट कमांडरच्या घरी पोहोचते केले. आतल्या कागदांमधे फक्त दोन कोरे होते.
२५ ऑक्टोबरला कामिकाझे तुकडीने आपला पहिला यशस्वी हल्ला केला. सहा विमानांनी पहाटे दवाओ विमानतळावरून उड्डाण केले आणि ती लगेचच शत्रूच्या तीन विमानवाहू नौकांवर जाऊन आदळली. ही तिन्हीही जहाजे निकामी झाली.
त्याच दिवशी सकाली ले. सेकीने माबलकात विमानतळावरून आपल्या सहकार्‍याबरोबर उड्डाण केले. त्यांना मार्ग दाखवणार्‍या एका विमानाच्या वैमानिकाने त्यावेळेचा वृत्तांत लिहिताना म्हटले “शत्रूच्या चार विमानवाहू नौका व इतर सहा नौका दिसल्यावर ले. सेकीने सुर मारला व तो एका विमानवाहू नौकेवर जाऊन आदळला. दुसरे एक विमान त्याच नौकेवर आदळले आणि त्या नौकेतून धुराचे मोठे लोट निघू लागले. अजून दोन वैमानिकांनी आपले लक्ष अचूकपणे टिपले.”


कामिकाझेच्या यशाची बातमी जपानच्या नौदलात झपाट्याने पसरली. त्या अगोदर जपानने याच नौकांवर ९३ लढाऊ विमाने आणि ५७ बाँबफेकी विमानांच्या सहाय्याने हल्ला चढवला होता पण त्याने शत्रूचे काहीच नुकसान झाले नव्हते. या पार्श्वभुमीवर कामेकाझेच्चे यश फारच उठून दिसत होते.
एडमिरल ओनिशीची आता खात्री पटली होती की हे मानवी टॉरपेडोच आता कामास येणार आहेत. त्याने २-एअर प्लिटच्या व्हाईस एडमिरल फुकुदोमेला या बाबतीत पटवले. “ याखेरीज आपल्याला दुसरा मार्ग नाही. तुझ्याही फ्लिटने हा मार्ग अनुसारायची वेळ आता आलेली आहे.”
अशा रितीने कामिकाझेचा मार्ग मोकळा झाला आणि तरूण वैमानिक या त्यागासाठी मोठ्या अहमहमिकेने या स्वर्गीय वार्‍यावर स्वार होण्यासाठी नावे नोंदवू लागली. जपानच्या मुख्य भुमीवरूनही कामिकाझेमधे सामील होण्यासाठी अनेक तरूण पुढे सरसावले व बोलावणे यायची वाट पाहू लागले…………..
क्रमश:
जयंत कुलकर्णी

No comments:

Post a Comment