Sunday, September 9, 2012

हिटलरचे शेवटचे १० दिवस……


हिटलरचे शेवटचे १० दिवस……

हिटलरचे शेवटचे १० दिवस……
बरोबर ६७ वर्षापूर्वी.
बंकरच्या बाहेर-

नाझी जर्मनीच्या पाडावानंतर तीनच आठवड्याने रशियन पोलिसदलाचा प्रमुख मेजर इव्हान निकितीन याने बर्लिनहून अहवाल पाठवला की फ्युररने स्वत:ला गोळी वैगरे काही घालून घेतलेली नाही ना त्याच्या प्रेताचे तेथे कुठे दफन झाले आहे. पण तशी अफवा मात्र जरूर होती. तो मृत्यू पावला आहे की नाही याचीच शंका आहे. हिटलर जिवंत आहे या अफवेची ही सुरवात होती.
या अफवा अशाच पसरत राहिल्याने दोस्त राष्ट्रांच्या गुप्तहेर खात्याने १९४५ साली या बाबतील सखोल चौकशी करायचा आदेश दिला आणि हळूहळू त्या काळात काय काय झाले होते याची कहाणी उभी राहिली. जी २८ माणसे हिटलरबरोबर त्याच्या बंकरमधे रहात होती त्यांना नंतर पकडण्यात आले आणि त्यांना वेगवेगळ्या खोल्यात ठेवून प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांचा प्रत्येक उत्तराशी व बाहेरच्या माहितीचा ताळमेळ घालण्यात आला. या सगळ्यातून हिटलरच्या अखेरच्या दिवसांचे एक स्पष्ट चित्र उभे राहिले. पण तसे हे अपूर्णच म्हणायला हवे कारण त्याच्या मनात काय चालले होते हे कोणीच सांगू शकत नव्हते…… ते हे अपूर्ण चित्र.

१९४५च्या ३० एप्रीलच्या दुपारी २.३० वाजता हिटलर त्याच्या पत्नीबरोबर फ्युररबंकरमधे बसला होता. त्याच वेळी त्याने आपल्या स्वयंचलीत वाल्थरची नळी आपल्या तोंडात घातली आणि त्याचा चाप ओढला व त्याच वेळी त्याची पत्नी इव्हा हिटलरने आपल्या दाताखाली सायनाईडची कॅपसूल चावली. रात्री १०.३० वाजता जनरल राटेनहबर आणि त्याच्या विश्वासू सैनिकांच्या तुकडीने ती दोन प्रेते अनेक वेळा पेट्रोलमधे भिजवली. त्याला आग लावल्यावर जे काही अवशेष उरले ते त्यांनी पुरून टाकले. रात्रभर रशियन तोफा गडगडत होत्या आणि त्यांच्या मार्‍यात १००० वर्षाचे आयुष्य असणार्‍या राईशस्टाग आणि ती वल्गना करणार्‍या हिटलरच्या थडग्याच्या (?) चिंधड्या ऊडत होत्या.
हिटलरच्या जन्मदिवसालाच म्हणजे २० एप्रिललाच त्याच्या शेवटास सुरवात झाली होती. त्या दिवशी चॅन्सेलरी गार्डनच्या ५० फूट खाली असलेल्या बंकरमधे जर्मन सैन्यातील वरीष्ठ अधिकारी तेथे त्यांच्या सुप्रीम कमांडरचे अभिष्टचिंतन करण्यास जमले होते. सगळ्यांचे गणवेष, पदके व बूट चकाकत होते पण ती चकाकी त्यांच्या चेहर्‍यावरून परावर्तीत होत नव्हती. ते ओढलेले आणि तणावग्रस्त दिसत होते. साहजिकच आहे. सर्व आघाड्यांवरून जर्मन फौजेच्या माघारीच्या बातम्या येत होत्या. रशियन फौजा बर्लिनची दारे ठोठावत होत्या तर एल्ब नदी पार करून त्यांच्याशी हातमिळवणी करायला ब्रिटन, फ्रान्स व अमेरिकेचे सैन्य मोठ्या तडफेने निघाले होते.
दहा महिन्यापूर्वी त्याच्या हत्येच्या कटाच्या वेळी झालेल्या स्फोटातून सहीसलामत वाचल्यावर त्याच्या व्यक्तिमत्वात बराच बदल झाला होता. तो आता एक पाय ओढत, पाठीत वाकून चाले आणि त्याच्या डाव्याहातातील कंप थांबविण्यासाठी तो डावा हात उजव्या हाताने दाबून धरत असे. पण त्याच्या आवाजाती जरब आणि नाट्य तेच होते व डोळ्यात तीच पूर्वीची चमक.
त्याच दिवशी जालेल्या बैठकीत फिल्ड मार्शल कायटेलने हिटलरला बिकट वस्तुस्थितीची पूर्ण कल्पना दिल्यावर हिटलरने जे उत्तर दिले त्यावर जमलेल्यांचा विश्वास बसेना. हिटलरने कायटेलला बाजूला सारले आणि तो म्हणाला “मूर्खपणा ! रशियाला बर्लिनच्याबाहेर आता एका रक्तरंजीत युद्धाला सामोरे जावे लागेल ज्याच्यात त्यांचा दारूण पराभव निश्चित आहे. त्यानंतर आपण दोस्तांच्या सैन्याला समुद्रापर्यंत मागे ढकलू”.
त्याच्या डोळ्यात आता वेगळीच चमक दिसत होती. सगळीकडे शांतता पसरली आणि कोणाच्या तोंडातून शब्द फुटेना.
राईश मार्शल हर्मन गोअरींगने पसरलेल्या भयाण शांततेचा भंग करत म्हटले “विजय शेवटी जर्मनीचाच होणार आहे पण आमचे एवढेच म्हणणे आहे की फ्युररने बर्लिन सोडून एखाद्या सुरक्षित जागी जावे आणि तेथून आपल्या सेनेचे संचलन करावे”.
हिटलरने त्याच्याकडे भेदक नजर टाकली. “ याचा अर्थ तुला एखाद्या सुरक्षित जागी जायचे आहे एवढाच आहे. तू जाऊ शकतोस”. गोअरींगने त्याचा राईश मार्शलचा बॅटन खाकेत धरला आणि त्याला एक सॅल्युट ठोकला व तेथून घाईघाईने बाहेर पडला. जाताना ट्रक भरून त्याच्या मौल्यवान वस्तू आणि मर्सडिस घेतली आणि बव्हेरीयाच्या दिशेने त्याने कूच केले. जणू काही बव्हेरियात गेल्यावर त्याची सुटका होणार होती.
गोअरींग गेल्यावर हिटलर परत त्याच्या नकाशांकडे वळाला आणि त्याचे नवीन डावपेच समजावून सांगायला लागला. त्या आठवणी सांगत असताना एक जनरल म्हणाला “ सैन्याच्या ज्या डिव्हिजन्स घेऊन तो हे नवीन डावपेच आखत होता त्या अस्तित्वात नाहीत हे आम्हाला चांगलेच ठाऊक होते पण त्याचे बोलताना एकताना आम्हाला असे वाटत होते की अजूनही काहीतरी होईल आणि आम्ही परत लढाईत उतरू शकू.”
त्या दिवशी तेथे जमलेल्या माणसांमधे एकच माणूस असा होता जो भ्रमिष्ट हिटलरच्या प्रभावाखाली नव्हता. त्याला जर्मन जनतेची काळजी लागली होती आणि तो म्हणजे अल्बर्ट स्पीअर. याच माणसाने युद्धसामग्रीचे अनाकलनीय उत्पादन करून हिटलरच्या युद्धाचा गाडा चालू ठेवला होता. पराभव झाल्यास हिटलरने त्याचे राइश नष्ट करायची एक योजना आखली होती व मार्च मधेच त्याला हिटलरच्या या भयानक योजनेचा पत्ता लागला होता. सर्व जिल्ह्याच्या नाझी प्रमुखांना त्याच्या हद्दीतील सर्व कारखाने, महत्वाच्या इमारती, खाणी, अन्नाचे साठे इ. नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. लष्कराला सर्व नदीवरील सर्व पूल, रेल्वे, कालवे, जहाजे इ. उध्वस्त करायचे आदेशही देण्यात आले होते. अल्बर्ट स्पिअरने सर्व जर्मनीत वादळी दौरे करून त्या सर्व प्रमुखांना हा आदेश पाळणे जर्मनीच्या हिताचे कसे नाही हे समजावून सांगितले. हिटलरच्या वाढदिवसाला हा आदेश परत घ्यायची विनंती करून जर्मनीला वाचवायचा प्रयत्न करायचा ठरवले पण ती विनंती ऐकल्यावर हिटलरने शुन्यात नजर लावली आणि म्हणाला “जर जर्मन नागरिकांनी शरणागती पत्करली तर त्यांची तीच लायकी आहे हे सिद्ध होईल. तसे झाले तर त्यांचा नाश व्हायलाच पाहिजे.”
हे उत्तर ऐकल्याव्र स्पीअरने स्वत:च्या जिवाची काळजी न करता करून हिटलरच्या या योजनेला सुरूंग लावायचा ठरवला. गेस्टापोंची त्याच्यावर नजर असतानाही त्याने परत जर्मनीभर दौरे आखले व सर्व प्रांत प्रमुखांना भेटून त्यांना हिटलरच्या या आज्ञा पाळू नयेत अशी आवाहने केली. कार्ल कौफमनने त्याला महत्वाची बंदरे नष्ट करण्यात येणार नाहीत असे आश्वासन दिले. बाकीच्यांनीही घाबरत का होईना याला मंजूरी दिली.
हिटलरच्या कडव्या दुराग्रही पाठिराख्यांच्या हातात त्याच्या ताब्यातील कारखान्यातील दारूगोळा पडू नये म्हणून तो विहिरींमधे आणि पाण्याने भरलेल्या खाणींमधे टाकून द्यायचे त्याने आदेश दिले. त्याच्या या आदेशामुळे अनेक प्राण वाचले असे म्हणायला हरकत नाही.
दरम्यानच्या काळात हिटलरने रशियन फौजांना बर्लिनच्या बाहेर फेकण्याच्या योजना बारीकसारीक तपशिलासह तयार केल्या होत्या. हे रशियन सेनेवरचे आक्रमण एस.एस चा जनरल फेलिक्स स्टाईना याच्या अधिपत्याखाली करण्यात येणार होते. त्याच्याशी टेलिफोनवर बोलताना हिटलर जवळजवळ किंचाळलाच “जो अधिकारी आपला एखादाही सैनिक या आक्रमणात मागे ठेवेल त्याला पाच तासात ठार केले जाईल”.
२२ एप्रिलच्या दुपारी हिटलरने त्या बंकरमधे स्टाईनाच्या पहिल्या विजयाची घोषणा केली. एस.एस.चा विकृत मनोवृत्तीचा प्रमुख हिमलरने टेलिफोनवरून बातमी दिली की स्टाईनाची फौज मोठ्या शौर्याने लढत आहे आणि रशियन फौजा बर्लिनमधून मागे हटत आहेत. पण त्याचवेळी कर्नल जनरल अल्फ्रेड जोडलच्या टेबलावर अनेक संदेश येऊन पडत होते. ते बघितल्यावर त्याची वाचाच बसली. त्याला काय करावे ते कळेना. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. तो बघून हिटलरने त्याला विचारले “काय झाले ?”
“फ़्युरर, स्टाईनाने हल्ला केलेलाच नाही. मार्शल झुकॉव्हचे रणगाडे बर्लिनमधे घुसलेत”.
हिटलरने समोर बघितले आणि त्याचा चेहरा काळानिळा पडला. “एस.एस. ! माझा विश्वासघात एस.एस. ने केला. पहिल्यांदा लष्कराने, मग लुप्फ़्तवाफने आणि आता तुम्ही….विश्वासघातकी सगळे.. ….” तीन तास हिटलर रागाने गुरगुरत होता, येरझार्‍या घालत होता. अखेरीस निराश होत त्याने एका खुर्चीत आपले अंग टाकले. “तिसरे राईश संपले ! संपले !” तो पुटपुटला. “आता माझ्यापुढे मृत्यूशिवाय दुसरा पर्याय नाही. मी येथेच थांबणार आहे आणि शेवटी मी आत्महत्या करेन. लढाई करायची असेल तर करणार तरी कशाने… गोअरींगला सांगा…तहाची बोलणी सुरू करायला…..”
हिटलरचे हे शब्द गोअरींगला सांगण्यात आले. १९४१ साली झालेल्या कायद्याने त्याला हिटलरचा वारस नेमण्याची तरदूत झाली होतीच. त्याला दोस्तराष्ट्रांबरोबर तहाच्या वाटाघाटी करायचा आत्मविश्वास होता आणि कमीत कमी त्याच्या स्वत:च्या सुटकेचे तरी प्रयत्न करता येतील या विचाराने त्याने हिटलरला रेडिओवर संदेश पाठवला – आपण घेतलेल्या निर्णयानुसार मी राईशचे नेतृत्व स्विकारावे हे आपल्याला मान्य आहे का ? मला जर आज रात्री १० पर्यंत आपले उत्तर आले नाही तर मी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी समजेन. – गोअरींग”
हा संदेश पाठवून गोअरींगने आपल्या शरीररक्षकांची संख्या १००० केली आणि तो जनरल आयसेनहॉव्हर यांना भेटायच्या तयारीला लागला. त्याने आयसेनहॉव्हरला संदेश पाठवण्यासाठी तो लिहायला घेतला तेवढ्यात हिटलरचा संदेश येऊन धडकला.-
तू जे केले आहेस त्यासाठी खरे तर तुला मृत्यूदंडच द्यायला पाहिजे. पण तू राजिनामा दिलास तर मी या शिक्षेचा आग्रह धरणार नाही. नाही दिलास तर मला पुढील कार्यवाही करावी लागेल. – हिटलर”.
अविश्वासाने या कागदाकडे गोअरींग टक लाऊन बघत असतानाच बुटांचा खाडखाड आवाज झाला आणि काही एस.एस.चे जवान आत आले आणि त्यांनी गोअरींगला अटक केली. हिटलरला खरे तर वारस नकोच होता.
गोअरींग हिटलरच्या बंकरमधून बाहेर पडल्यापडल्या तासाच्या आतच हिटलरने त्याची चिता रचायची योजना मोठ्या काळजीपूर्वक आखायला चालू केले. शांतपणे आणि विचार करून त्याने अमेरिकेच्या सैन्याबरोबर लढणार्‍या जनरल वेंक्सच्या १२व्या आर्मीला बर्लिनला माघारी बोलावले. बर्लिनमधील प्रत्येक माणसाला व मुलाला रशियाच्या सेनेला थांबवण्याच्या लढाईत सामील व्हायच्या आज्ञा देण्यात आल्या. जे टाळतील त्यांना जागेवरच फासावर चढवण्यात येणार होते.
हा आदेश मिळाल्यावर नाझी पार्टीचा एक जेष्ठ पुढारी वेगेना याने हिटलरला फोन करून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला “ पश्चिमेला जर अमेरिकन आणि ब्रिटनच्या सैन्यासमोर ताबडतोब शरणागती पत्करली तर रशियन सेनेला थोपवता येईल आणि बराच विध्वंस टाळता येईल” हे ऐकल्यावर हिटलर म्हणाला “ विध्वंस ! मला आता तोच पाहिजे आहे. त्या विध्वंसानेच माझा पराभव उजळून निघेल”. दुसर्‍याच दिवशी २५ एप्रिलला रशियन सैन्याने बर्लिनला वेढा घातला.
गेल्या सात दिवसात बंकरमधे
हिटलरच्या भोवती असलेल्या त्याच्या सहकार्यांमची संख्या हळुहळु कमी होत चालली होती. गोबेल्स आणि त्याच्या बायकोने त्यांची सहा मुले आता बरोबर आणली होती. या मुलांना त्याने स्वत: आत्महत्या करायच्या अगोदर ठार मारले हे आपल्याला माहीत आहेच. (पण या मुलांना ठार मारल्यानंतर ती बाई शांतपणे पत्ते खेळत होती हे कदाचित माहिती नसेल)
गोबेल्स कुटुंब -

हिटलरचा आजवरच्या वाटचालीतील साथीदार मार्टीन बोरमन याने तेथेच रहायचा निर्णय घेतला. ईव्हा ब्राऊनने तेथून जायला नकार दिला. हिटलरच्या खोलीच्या शेजारी असलेल्या या मोठ्या खोलीत २६ वरीष्ठ सेना अधिकारी आणि इतर जण होते.
जसे जसे रशियनसैन्याच्या तोफांचा आवाज एकू यायला लागला तसे तसे बंकरमधील वातावरण बदलू लागले. थोड्याच वेळात त्या तोफांच्या गोळ्यांनी तो बंकर हादरायला लागला तसे ते फारच बदलून गेले. सगळ्यांच्या मनावरील ताबा सुटला व दारू पाण्यासारखी वाहू लागली. शिस्तीचा बाऊ करणारे प्रशियन सेनानी आपले कपडे काढून सेक्रेटरींबरोबर बेफाम नृत्य करू लागले, कोणालाच कसले भान उरले नाही.
इकडे हिटलर मात्र भ्रमिष्टासारखा नकाशासमोर उभा राहून बैठका बोलवत होता. कोणी हजर रहात होते, तर कोणी हजर रहात नव्हते. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की रशियन सैन्य बर्लिनच्या एका ट्युब रेल्वेच्या मार्गातून त्याच्या बंकरपर्यंत विनाविलंब येऊ शकते. त्याने लगेचच तो मार्ग पाण्याने भरून टाकायचा आदेश दिला. ज्याला हा आदेश दिला तो जनरल क्रेबने नापसंती दर्शवत सांगितले की तसे करणे शक्य नाही कारण त्यात हजारो जखमी जर्मन सैनिक लपलेले आहेत. हिटलरने त्याचे वाक्य तोडत आज्ञा केली “मी सांगतो तसे करा.” थोड्याच वेळात ती आज्ञा पाळण्यात आली.
२८ एप्रिलला स्टॉकहोमच्या वार्ताहराच्या एका प्रेस रिपोर्टवरून एक वाईट बातमी कळाली ती म्हणजे हिटलरचा सगळ्यात जास्त विश्वास ज्याच्यावर होता तो एस.एस.चा प्रमुख हाईनरिश हिमलर काऊंट बेनाडोट याच्या बरोबर जर्मनीच्या शरणागतीच्या वाटाघाटी करतोय. हा मात्र न पचणारा धक्का होता. ते ऐकल्यावर हिटलर किंचाळला “उंड येट्झ ड ट्वाय हाईनरिश” म्हणजे आता माझा विश्वासू हाईनरीशही !” पण त्याचा हा शेवटचा आक्रस्तळेपणा फार थोड्यावेळ टिकला. तो एकदम शांत झाला. बहुतेक त्याला आता काय झाले आहे आणि काय होणार आहे हे कळाले असावे. हा शेवट होता !
त्या बंकरमधील शेवटचे दोन दिवस तर सगळ्यात विचित्र होते असे म्हणायला हरकत नाही. २९ एप्रिलला चॅन्सेलरीवर पडणार्या बाँबच्या साक्षीने एका साध्या सुटसुटीत समारंभात हिटलरचे आणि इव्हा ब्राऊनचे लग्न झाले.
इव्हा ब्राऊ -

त्यानंतर हिटलरने त्याच्या चिटणीसाला त्याच्या शेवटचे राजकीय मृत्यूपत्र लिहायला सांगितले अर्थात त्यात त्याने आत्तापर्यंत जे म्हटले होते त्याचीच पुनरावृत्ती होती. त्यात गोअरींग आणि हिमलरला नाझी पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे अशीही नोंद त्याने मुद्दामहून करायला लावली आणि एडमिरल डॉनिट्झला त्याने आपला उत्तराधिकारी नेमले. त्यानंतर त्याने एका वर्तमानपत्रातून ( ही त्याच्याकडे नियमीत आणली जात ) मुसोलिनीच्या मृत्यूची व त्याच्या आणि क्लाराच्या प्रेतांच्या विटंबनेची बातमी सविस्तर वाचून दाखवली. हिटलरने अगोदरच आज्ञा केली होती की आत्महत्येनंतर त्यांची प्रेते पूर्णपणे नष्ट करण्यात यावीत पण आता त्याने ती आज्ञा परत परत वाचून दाखवली.
दुपारी नेहमीप्रमाणे त्याने रशियन फौजांच्या आक्रमणाचा आढावा घेतला. १ मेला चॅन्सेलरीवर हल्ला होईल असा अंदाज बांधण्यात आला.
“मग आपल्याकडे फार वेळ नाही. मला त्यांच्या हातात जिवंतपणी पडायचे नाही. काय वाट्टेल ते होऊ देत !”
त्याच रात्री उशीरा त्याच्या नोकराने सगळ्यांना मुख्य बंकरमधे बोलावले. हिटलरला सगळ्यांचा निरोप घ्यायचा होता. सगळे जमल्यावर हिटलरने शांतपणे प्रत्येकाशी हस्तांदोलन कारून प्रत्येकाचा निरोप घेतला. उपस्थित असलेल्या एका माणसाने नंतर आठवणीत सांगितले “ त्याच्या नजरेत वेगळेच भाव होते. मला वाटले तो आमच्यातून तेव्हाच निघून गेला होता”
इकडे स्टाफ कॅंटीनमधे हलकल्लोळ माजला होता. कोणीतरी दारूची एक बाटली घेतली. टेबलावर उडी मारून त्याने ती तोंडाला लावली व तो ओरडला “मृतांच्या आत्म्यास शांती लाभो” अजून कोणीतरी ग्रामोफोन चालू केला. मग त्यावर लावलेल्या गाण्याच्या तालावर नाचगाणी आणि गोंधळ पहाटेपर्यंत चालूच होता. कोणीतरी हिटलरने हे सगळे थांबवायला सांगितले आहे आहे असा निरोप आणला पण त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याच्या आज्ञा ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हते.
३० एप्रिलला बरोबर दोन वाजता हिटलरने नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण घेतले. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता पण त्याने चवीने जेवण केले. जेवणानंतर तो आणि ईव्हा त्या बंकरच्या हॉलमधे गेले. इव्हाने पांढर्‍या रंगाच्या स्कर्टवर गडद निळ्या रंगाचा कोट घातला होता. तेथे त्याचे आजवरचे साथीदार – बोरमन, गोबेल्स इ.. त्याची वाट बघत थांबले होते. त्या सगळ्यांनी एकामेकांचा न बोलता निरोप घेतला आणि ते आपापल्या खोल्यांमधे परतले.
हिटलरच्या खोलीचा दरवाजाचा बंद झाला आणि एका सैनिकाने त्या दरवाजासमोर जागा घेतली. काहीच क्षणात गोळी झाडल्याचा आवाज झाला आणि सगळा खेळ संपला.
जे राईश हजार वर्षे टिकणार होते ते त्या क्षणी नष्ट झाले…………..
उध्वस्त फ्युररबंकर -

जयंत कुलकर्णी.

No comments:

Post a Comment