Sunday, September 9, 2012

युद्धकथा-…….जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला… २ ….

युद्धकथा-2…….जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला… २ ….

ज्या बटान डेथ मार्च वरून एवढा गदारोळ उठला होता तो कशामुळे झाला व त्यात काय झाले हे अगोदर बघून मग परत या खटल्याकडे वळू….
डिसेंबर १९४१ मधे झालेल्या पर्ल हार्बरवरच्या हल्ल्यानंतर जपानचे त्रेचाळीस हजार सैनिक जनरल मासाहारू होम्माच्या अधिपत्याखाली लूझॉनला उतरले. या सैन्याने दक्षिणेला असलेल्या फिलिपाईन्सच्या राजधानीवर आक्रमण केले. जपानी सैन्याचा आवेश व वेग बघितल्यावर अमेरिकन सैन्याचा कमांडर डग्लस मॅकार्थर याने मॅनिला शहर असंरक्षित म्हणून जाहीर केले. म्हणजे आता हे शहर लढविण्यात येणार नव्हते. अमेरिकन सैन्याने लवकरच हे शहर जपान्यांच्या दयेवर सोडून दिले. दरम्यानच्या काळात अमेरिकन व फिलिपाईन्सच्या सैन्याने बटानच्या द्विपकल्पावर माघार घेतली.
ही माघार घेताना जनरल मॅकार्थरने दोन मोठ्या चूका केल्या. त्यातील पहिली म्हणजे जपानी फौज त्याच्या फौजेपेक्षा प्रचंड मोठी आहे हे समजणे आणि दुसरी म्हणजे बटानवर माघार घेतलेल्या सैन्यासाठी पुरेशी रसद आहे हे गृहीत धरणे. परिस्थिती बरोबर उलटी होती, जपानचे सैन्य त्याच्या सैन्याच्या मानाने लहान होते आणि बटान वर असलेले अन्न तेथे असलेल्या सैनिकांनाच पुरेसे नव्हते. जेव्हा मॅकार्थरचे सैन्य बटानला पोहोचले तेव्हा त्यांची साहजिकच उपासमार सूरू झाली. या उपासमारीने त्रस्त झालेल्या सैन्याला घेऊन जपानच्या आक्रमक सैन्यावर प्रतिहल्ला करण्याचा त्यामुळे प्रश्नच नव्हता. राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी मॅकार्थरला युद्धभूमी सोडून ऑस्ट्रेलियाला जायची परवानगी दिली आणि या अडकलेल्या सैन्याला कोणी वाली उरला नाही. जपानच्या सैन्याने आक्रमक धोरण स्विकारून अमेरिकन सैन्याला सळो का पळो करून सोडले. ९ एप्रिलला उपासमारी, हगवण व मलेरियाने त्रस्त झालेल्या अमेरिकेच्या ७६००० सैनिकांनी जपानच्या ४३,००० सैनिकांच्यापुढे शरणागती पत्करली.
जनरल होम्माला या अमेरिकन युद्धकैद्यांची अडचण व्हायला लागली होती कारण या द्विपकल्पावरून तो कॉरेगिडीवर हल्ला करण्याच्या तयारीस लागला होता. येथे एक नमूद केले पाहिजे की जनरल होम्माचाही या बाबतीत अंदाज चुकला होता. त्याचा अंदाज होता बटानवर अमेरिकेचे साधारणत: चाळीस हजार सैनिक शरण येतील. त्याने या युद्धकैद्यांना हलवायची तयारी करायला त्याच्या पाच स्टाफ अधिकार्‍यांना सांगितले व त्यांनी अंदाजा एवढ्या सैनिकांना हालवायची योजना आखली होती. आता त्यांच्या समोर दुप्पट युद्धकैद्यांना हालवायचे आव्हान होते आणि त्यांचे सगळे नियोजन कोलमडले.
अमेरिकन सैनिक या द्विपकल्पावर पसरले होते. त्यांना गोळा करून बालांगा येथे न्यायचे व त्यांना अन्नाचा पुरवठा करायचा. तेथून त्यांना ३१ मैलांवर असलेल्या सॅन फर्नांडो येथे न्यायचे व येथे त्यांना रेल्वेमधे बसवायचे अशी या योजनेची साधारण रूपरेषा होती. शेवटी हे युद्धकैदी ९ मैल चालून कॅंप ओ’डोनेल येथे पोहोचणार होते. या मूळ योजनेमधे औषधोपचार व अन्नवाटपासाठी अनेक थांब्यांचा विचार केला गेला होता. ही युद्धकैद्यांची वाटचाल जनरल होम्माने १९२९ सालच्या जिनेव्हा करार लक्षात घेऊन आखली होती हे निर्विवाद. हे ऑपरेशन सुरू होण्याआधी जनरल होम्माने एक विशेष आदेश काढून युद्धकैद्यांना मैत्रीपूर्ण वागणूक द्यावी असा हुकूमही बजावला होता.
पण ही योजना कोलमडली आणि अशी कोलमडली की अखेरीस त्याची किंमत जनरल होम्माला त्याच्या प्राणांनी चुकवावी लागली.

ही योजना कोलमडली त्याची अनेक कारणे आहेत..एक म्हणजे युद्धकैद्यांच्या संख्येचा चुकलेला अंदाज. दुसरे म्हणजे बटान एप्रिलपर्यंत पडणार नाही हा जपानी अधिकार्‍यांचा अंदाज. या अंदाजामुळे युद्धकैद्यांसाठी औषध, अन्नपाणी इ.ची तयारीच झाली नव्हती तिसरे कारण म्हणजे हे सगळे होईपर्यंत तेथे जपानच्या सैनिकांची संख्या ८०,००० झाली होती आणि त्यांच्याकडे त्यांच्याच सैन्याला पुरेल एवढे अन्न/औषधे नव्हते. अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी सैनिकांना एकत्र करण्याची जबाबदारी उचलली मात्र त्यांनी जपानच्या योजनेला सहकार्य करायला नकार दिला. एका अमेरिकन डॉक्टरने म्हटले, “ हे सैनिक नव्हते तर आजारी माणसे होती”
अमेरिकन युद्धकैद्यांना सरसकट वाईट वागणूक मिळाली हे खोटे आहे. काही नशीबवान युद्धकैद्यांना ट्रकमधून नेण्यात आले पण बहुसंख्य सैनिकांना चालवत नेण्यात आले. युद्धकैद्यांच्या काही तुकड्यांना जास्त अन्न मिळाले तर काहिंना बिलकूल नाही. काही जपानी सैनिक युद्धकैद्यांना मानाने वागवत तर काहींनी अत्यंत निर्दयपणे आपल्या संगिनी चालवल्या. जपानी सैनिक अमेरिकन सैनिकांची हेटाळणी करत कारण त्यांच्या लष्करी नियमात शरणागती हा शब्दच नव्हता. या भयानक प्रवासातून फक्त मृत्यूच सुटका करू शकत होता. दहा हजार सैनिक या प्रवासात मृत्यूमुखी पडले.
ज्या जपानी सैनिकांनी क्रुरतेने युद्धकैद्यांना वागवले त्याचा अभ्यास करून कारणे शोधण्यात आली. एक तर जपानी सैनिक त्यांच्या शत्रू इतकेच या युद्धाने वैतागलेले होते. त्यांचेही सोबती त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यूला कवटाळत होते. शरणागती ही एक बेशरमेची बाब आहे असे त्यांची संस्कृती असल्यामुळे त्यांना या शरण आलेल्या अमेरिकन सैनिकांचा मनस्वी तिरस्कार वाटत असे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जपानी अधिकार्‍यांचा तुटवडा. यांची संख्या जास्त असती तर कदाचित वेगळी परिस्थिती असती. तिसरे कारण होते जनरल होम्माला मदत म्हणून पाठविण्यात आलेले कनिष्ट अधिकारी. यांची मने वंशद्वेशाने भरलेली होती.
जनरल होम्माने त्याच्यावर चालवलेल्या खटल्यात “तो पुढच्या आक्रमणाच्या तयारीत इतका गुंतला होता की या युद्धकैद्यांचे व्यवस्थापन त्याच्या डोक्यातच नव्हते.” असे प्रतिपादन केले. हे खरे असण्याचा संभव नाकारता येत नाही. या डेथ मार्च नंतर काहीच दिवसांनी होम्माच्या सैन्याने कॉरिगिडॉरवर आक्रमण केले. तेथे लढत असलेल्या अमेरिकन सैन्यानेही ८ मे १९४२ रोजी शरणागती पत्करली. याच सुमारास जनरल होम्मालाही जपानला परत बोलाविण्यात आले. उरलेले युद्ध त्याने जपानच्या माहिती व तंत्रज्ञान या खात्याचा मंत्री म्हणून व्यतीत केले.
या डेथ मार्चची बातमी १९४४च्या जानेवारीत अमेरिकेत पोहोचली ती या द्विपकल्पावरून फिलिपाईन्सच्या भुमिगत बंडखोरांनी सोडवलेल्या अमेरिकन सैनिकांकडून. या मार्चची वर्णने जेव्हा वर्तमानपत्रात प्रकाशीत झाली तेव्हा अमेरिकेत संतापाची एकच लाट उसळली आणि या घटनेचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली जाऊ लागली……
जपानने २ सप्टेंबर १९४५ ला शरणागती पत्करली. अमेरिकन सेनाधिकार्‍यांनी जनरल होम्माला टोक्योजवळील एका युद्धकैद्याच्या छावणीत डांबले व तेथेच बटानच्या डेथ मार्चमधील त्याच्या सहभागाची चौकशी करण्यात आली. जपानच्या सरकारने जनरल मॅकार्थरला खूष ठेवण्यासाठी (आता तो दोस्त राष्ट्रांच्या सेनादलाचा सूप्रीम कमांडर झाला होता) होम्माचे पद व शौर्यपदके काढून घेतली. जनरल मॅकार्थर याच्या मागे असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. डिसेंबरमधे मग त्याला मॅनिलाला हलविण्यात आले.
खटला उभा राहिला आणि बचावपक्षाच्या वकिलांनी अव्यवहारीपणे या खटल्याच्या प्रक्रियेबद्दलच शंका उपस्थित करून हा खटलाच रद्दबादल कसा करता येईल याकडे लक्ष पुरवले. पहिल्याच फेरीत जॉर्ज फरनेसने जनरल डग्लस या न्यायालयाच्या प्रमुखपदी कसा राहू शकतो याबद्दल शंका उपस्थित केली. तो म्हणाला, “एकच माणूस फिर्यादी, फिर्यादीचा वकील, न्यायाधीश, ज्यूरी आणि शेवटचा निर्णय घेणारा या पदावर कसा काम करू शकतो. ज्याने आरोपीच्या सैन्याकडून पराभव पत्करला आहे त्याच्या लढाईतील गुन्ह्याबद्दलच्या खटल्यात असा माणूस निरपेक्षपणे या भूमिका निभवू शकेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.”
अर्थात हा मुद्दा एकमताने फेटाळण्यात आला. आरोपीच्या वकिलाने हा मुद्दा उपस्थित करायचे धाडसच कसे केले असे विचारून त्याला गप्प करण्यात आले व त्याला त्याची या प्रश्नाचे स्वरूप “आरोपीने ज्याचा पराभव केला आहे” ऐवजी “आरोपीला ज्याने युद्धात विरोध केला आहे” असे बदलायला सांगितले.

त्यानंतर पेल्झने दुसरा मुद्दा मांडला. फिर्यादी पक्षाने ऐकीव माहितीवरून कागदपत्रे तयार केली आहेत व ती या न्यायालयासमोर मांडायला परवानगी देऊन न्यायालय विरूद्धपक्षाला जरा अनाकलनीय सवलत देत आहे असा जोरकस मुद्दा मांडताना तो म्हणाला, “अनेक अमेरिकन सैनिकांची गोळा केलेली प्रतिज्ञापत्रके येथे पुरावा म्हणून दाखल केली गेली आहेत. अमेरिकन कायद्याचा ज्याचा अभ्यास आहे त्याला हा मोठा धक्काच आहे. त्या सैनिकांना येथे प्रत्यक्ष साक्ष द्यायला बोलावायला पाहिजे होते असे आमचे म्हणणे आहे. या आरोपीचा साक्ष देणार्‍यांची उलटतपासणी करायचा मुलभूत हक्क त्यामुळे डाववला जातो आहे.”
अर्थात पेल्झचे हेही म्हणणे ताबडतोब फेटाळून लावण्यात आले. या पाच न्यायाधीशांपैकी एक जनरल ऑर्थर ट्रूडॉ याने काही वर्षानंतर कबूली दिली की प्रतिज्ञापत्रकाला पुरावे मानायला त्याला जड जात होते पण त्याला जनरल मॅकार्थरकडून सक्त सुचना होत्या की जर साक्षीदार पुढे आले नाहीत तर या पत्रांचा वापर करायला लागला तरी हरकत नाही पण…मला वाटते आम्ही एक वाईट प्रथा पाडली आहे.”

प्राथमिक वादविवाद झाल्यावर फिर्यादी पक्षाने साक्षीदार बोलाविण्यास सुरवात केली. जसे जसे साक्षीदार पिंजर्‍यात येऊन त्यांच्या भयानक कहाण्या सांगू लागले तसे ज. होम्मा खिन्न दिसू लागला. संध्याकाळी त्याचे वकील घरी गेल्यावर तो शांतपणे सिगरेट ओढत त्याच्या घरी पत्रे लिहित बसे किंवा कोळशाने रेखाटने करत बसे. त्याने एक बाडही लिहीले होते जे त्याने शेवटी त्याचा रक्षक मित्र कॅप्टन कार्टरच्या स्वाधीन केले. हे इंग्रजी मधे लिहिलेले त्याचे आत्मवृत्त होते. त्याच्यावर त्याने स्वहस्ताक्षरात “My Biography : Masaharu Homma” असे लिहिले होते.
Flashback…
जनरल मासाहारू होम्माला खरे तर लेखक व्हायचे होते. लहानपणी त्याचे ध्येय तो हेच सांगायचा. कवीमनाचा असल्यामुळे हायस्कूलमधे असतानाचा त्याच्या काही कथा व कविता प्रतिष्ठीत मासिकांमधे प्रकाशीत झाल्या होत्या. दुर्दैवाने १९०५ मधे रशियाशी जपानचे युद्ध सूरू झाले, त्यावेळी त्याचे वय होते १७. सगळ्यांचा देशाभिमान टोकाला पोहोचला होता आणि त्याच भरात त्याने जपानच्या “मिलिटरी एकॅडमी” मधे प्रवेश मिळवला. १९०७ साली तो त्या कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन अधिकारी झाला.
काहीच वर्षात होम्मा जपानच्या इंपिरीयल स्टाफ कॉलेज” मधूनही पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन बाहेर पडला. त्याचा वर्गमित्र होता “हिडेकी टोजो” हो! तोच ! जपानचा भावी पंतप्रधान ज्याने जपानला या युद्धात खेचले. होम्माला तो अजिबात आवडत नसे. “तो अत्यंत दुराग्रही होता आणि मला तो आवडत नसे. त्याहूनही त्याचे नाझी विचार आणि माझे व्यक्तिस्वातंत्र्य मानणारे विचार हेही अजिबात जुळत नसत”

१९१३ साली होम्माने एका प्रसिद्ध गेशाच्या तोशिको तामूरा नावाच्या मुलीशी लग्न केले. ब्रिटीश फौजेत असताना त्याने पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता आणि जिंकल्यानंतर लंडनमधे झालेल्या विजयोत्सवाच्या मिरवणूकीमधेही त्याने भाग घेतला. त्याच वर्षाच्या शेवटी त्याला त्याच्या आईकडून एक भयंकर बातमी मिळाली ती म्हणजे त्याची पत्नी साडो बेट सोडून टोक्योला मुलांना घेऊन स्थायिक झाली आहे आणि तिने वेश्याव्यवसाय स्विकारला आहे. (कदाचित गेशा, वेश्या नसावी) होम्माने मुलांचा ताबा व घटस्फोटासाठी घसघसशीत रक्कम मोजली व मुलांना परत साडोला रवाना केले. त्यावेळी त्याच्या मित्राला त्याने लिहिले, “ माझ्या प्रेमाच्या अंत्यविधीचा खर्च मी उचलला आहे”
ब्रिटिश सेनेमधे काम केल्यानंतर त्याची नेमणूक जपानच्या लंडमधील वकिलातीत लष्करी सहाय्यक म्हणून झाली. याच नोकरीत असताना त्याने युरोपभर प्रवास केला. १९२२ साली त्याला मेजर पदी बढती मिळून त्याची दिल्ली येथे जपानचा “रेसिडेंट ऑफिसर” म्हणून त्याची नेमणूक झाली. भारतात तो तीन वर्षे राहिला. त्याने भारताचे वर्णन “जगातील सगळ्यात आश्चर्यकारक देश” असे केले आहे.
१९२६ साली तो जपानला परत गेला व त्याने एका धनाड्य घटस्फोटीतेशी परत लग्न केले. तिचे नाव होते फुजिको तकाता. ही एका कागद कारखानदाराची मुलगी होती (सुंदरही होतीच) व जगभर फिरलेली व पाश्चात्य जगाशी ओळख असलेली स्त्री होती. होम्मा सेनादलात वर चढतच होता. १९४१ साली टोजो पंतप्रधान झाला आणि अचानक युद्धाचे वारे वहायला लागले. १९४१ च्या नोव्हेंबरमधे होम्माला जपानच्या चौदाव्या इंपिरियल आर्मीची सुत्रे स्विकारण्यास सांगण्यात आली आणि त्याच्यावर फिलिपाइन्स जिंकण्याची जबाबदारी टाकण्यात आली.
मासाहारू होम्माने त्या पुस्तकात लिहिले होते, ’ अमेरिकेच्या विरूद्ध युद्ध पुकारणे म्हणजे स्वत:चा नाश ओढवून घेणे. टोजोला एंग्लो-सॅक्सन वंशाची कल्पना नाही ना त्याला त्यांची ताकद माहिती आहे. चीन बरोबरच्या लांबलेल्या युद्धाने जपानची अगोदरच दमछाक झालेली होती त्यातच अमेरिका व इंग्लंडशी युद्धाचा विचार करणे हे शुद्ध वेडेपणा होता.”
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा खटला बर्‍यापैकी जनरल होम्माच्या विरूद्ध गेलाच होता याला कारण होते होणार्‍या काही साक्षी. या साक्षीदारांनी त्यांनी पाहिलेल्या शिरच्छेदांची, जिवंत पुरलेले मरणोन्मूख सैनिक, बलात्कार, कत्तली अशा भयानक प्रकारांचे इतके प्रभावी वर्णने केली की ऐकणार्‍याच्या काळजाचा थरकाप उडेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे फिर्यादी पक्षाला या डेथ मार्चच्या रस्त्यापासून जनरल होम्माचे मुख्यालय फक्त पाचशे फूटावर होते हे सिद्ध करण्यात यश आले.
दुसर्‍या बाजूला जनरल होम्माला या सगळ्या प्रकारांची माहीती होती असे सिद्ध करणारा एकही पुरावा फिर्यादी पक्ष सादर करू शकले नाही. सुरवातीला या साक्षीदारांच्या कहाण्या ऐकताना ज. होम्मा “खोटे आहे” अशा अर्थाने जोरजोरात मान हलवत असे. पण जशा अनेक कहाण्या उजेडात येऊ लागल्या तसा त्याचा चेहरा बदलला व त्याने जमिनीवर डोळे लावले. काही वेळा तो त्या कहाण्या ऐकून डोळ्यांना रुमालही लावत असे. पेल्झने त्याच्या रोजनिशीमधे लिहिले, “ तो या कहाण्यांनी तुटतोय हे मला दिसत होते.. होम्माला या अत्याचारांची कल्पना नव्हती यावर माझा पूर्ण विश्वास होता…” जनरल होम्माने हा खटला चालू असताना एक चिठ्ठी पेल्झकडे सरकवली त्यावर त्याने लिहिले होते,
“ माझ्या सैनिकांनी हे अत्याचार केले आहेत हे ऐकून मला धक्का बसला आहे. मला माझ्या सैनिकांची लाज वाटते”………
क्रमशः….

जयंत कुलकर्णी.
ही कहाणी पेल्झची मुलाखत ज्याने घेतली त्या लेखकाच्या लेखावर, Lack of Protection to war crime suspects under War Crimes Law of United States व वेळोवेळी काढलेल्या काही नोटसवर बेतलेली आहे…….

No comments:

Post a Comment